मुंबई : आजपासून दहावीची बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी आहेत. तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थिनी आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात अधिक माहिती दिली.
परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रात किमान अर्धा तास आधी उपस्थित राहणं आवश्यक असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं. परीक्षा काळातल्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी राज्यात 273 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विशेष महिला भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळण्यासाठी बहुतांश विषयांच्या परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार करू नयेत. दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन डॉ. काळे यांनी केले.
अभ्यास माझा दहावीचा, दहावीचे सर्व विषय समजून घ्या सोप्या भाषेत एका क्लिकवर : https://www.youtube.com/playlist?list=PLh0Ol8Y0tIRSiniQ9q_u7zM2s5C6BKfKc
दहावी परीक्षेआधी वाशिममधील शाळेतील विद्यार्थ्यांना आत्महत्या न करण्याची शपथ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर वाशिममधील एका शाळेने विद्यार्थ्यांना आत्महत्या न करण्याची शपथ दिली आहे. वाशिमच्या नालंदानगर भागातील गौरी शंकर विद्यालयात दहावीच्या निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ही शपथ देण्यात आली. कार्यक्रमात आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही शपथ घेतली.
पाचवी ते दहावीपर्यंतच्या गौरी शंकर विद्यालय शालेय शिक्षणाबरोबर दैनंदिन आयुष्यातील कठीण प्रसंगात मार्गदर्शन करण्याचं काम करतं. शालेय जीवनात कठीण प्रसंगी मी कुठल्याही परिस्थितीला न घाबरता आत्महत्या करणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली जाते. ही शपथ भावी संघर्षमय जीवनात प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास विद्यार्थ्यांना वाटतो. तसंच घरातील सगळ्या सदस्यांनाही आत्महत्या करण्यापासून परावृत्त करु, असंही विद्यार्थ्यांनी सांगितलं.
गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. गुण कमी मिळणं, नापास होण्याची चिंता कायमच विद्यार्थ्यांच्या मनात असते आणि आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्याचे विचार मनात येतात. मात्र हे नकारात्मक विचार दूर करण्यासाठी या शाळेने घेतलेला शपथेचा उपक्रम, विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात सकारत्मक उर्जा आणि बदल घडवणारा आहे. इतर शाळांनी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना जगण्याचं बळ दिल्यास येत्या काळात 'विद्यार्थी आत्महत्या' शब्द नाहीसा होईल.
दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, गैरप्रकार टाळण्यासाठी 273 भरारी पथकांची नेमणूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Mar 2020 11:24 AM (IST)
राज्यभरातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा, आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी परीक्षा देणार, गैरप्रकार टाळण्यासाठी 273 भरारी पथकांची नेमणूक
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -