Solapur : मराठा आंदोलक मनोज जरांगेंची (Manoj Jarange) प्रकृती ढासळताच मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यभरात तीव्र निदर्शने, वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचं चित्र दिसत आहे. तर सोलापूरात आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 'जर तुम्ही सोलापुरात नसाल तर व्हिडीओ कॉल करून आमच्या भावना ऐकून घ्या', अशी मागणी आंदोलकांनी शिंदे यांच्याकडे केलीय. यावर काँग्रेसची बैठक सुरु आहे, आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत, व्हिडीओ कॉल शक्य नसल्याची भूमिका आमदार प्रणिती शिंदेनी घेतलीय
प्रणिती शिंदेंचे आंदोलकांना समजवण्याचे प्रयत्न
दरम्यान आमदार प्रणिती शिंदेनी फोनवर बोलताना आपण "काँग्रेसच्या इतर कोणत्याही आमदाराच्या घरी गेला नाही, माझ्याच घरी आलात" असे म्हणताच आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही इथे येऊन चूक केली असे तुम्हाला म्हणायचं आहे काय? असा प्रश्न आंदोलकांनी प्रणिती शिंदेना केला आहे. फोनवरून आमदार प्रणिती शिंदे आंदोलकांना समजवण्याचे प्रयत्न करीत आहे
दौंडमध्ये मराठा आंदोलकानी अडविला पुणे-सोलापूर महामार्ग
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळत चालल्याने आणि राज्य सरकार मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत दौंड तालुक्यातील यवत परिसरातील मराठा समाज आक्रमक झाला असून शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहे. यवत येथे पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गवर यवत हद्दीत मराठा समाज बांधवांनी चार बैलगाड्या आणून रस्ता रोको आंदोलन केलंय. जवळपास 1 तासाहून पुणे सोलापूर महामार्ग अडविल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच-रांग लागल्या आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. सरकार नुसतं आश्वासन दाखवीत असून सरकारने लवकरात लवकर आश्वासन पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केलीय.
हिंगोलीत मराठा आंदोलकांनी बस पेटवली, चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण
हिंगोली मध्ये मराठा आरक्षणाचे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण मिळाला आहे. वसमत हून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसला अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिले आहे. यामध्ये परिवहन विभागाची बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यांमध्ये जागोजागी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये हिंसक वळण मिळाले आहे. वसमतहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसला अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिले आहे. या बस मध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते परंतु हे प्रवासी अगोदरच गाडीतून उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे