Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळं भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळालं असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. मी गृहमंत्री झाल्यामुळं भ्रष्टाचार करणाऱ्यांना अडचण होत असल्याचे फडणवीस म्हणाले होते. म्हणून मी भीमा पाटस कारखान्याच्या गैरव्यवहाराचे प्रकरण पुन्हा त्यांच्याकडे पाठवले होते. पण त्यावर कारवाई झाली नसल्याचे राऊत म्हणाले. राऊत मुंबईत आज प्रसारमाध्यमांशी बोलत बोलत होते.


फडणवीस गृहमंत्री झाल्यानं भ्रष्टाचार करणाऱ्यांची अडचण झाली नसून, त्यांना संरक्षण मिळालं आहे. विशेषत: त्यांच्या पक्षात जे आहेत, त्या लोकांना असे राऊत म्हणाले. त्यांच्या अवती भवती जे आहेत चोर लुटारु, भ्रष्टाचारी या सगळ्यांना संरक्षण मिळत आहे. 500 कोटींचे गैरव्यवहाराचे प्रकरण मी पुराव्यानिशी दिलं आहे. तरी कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे राऊत म्हणाले.


दादा भुसेंच्या गिरणा सहकारी साखर कारखान्यात 1800 कोटींचा गैरव्यवहार


दौंडचा भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आणि दादा भुसेंचा गिरणा सहकारी साखर कारखान्याचे 1800 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण आहे. यावर सरकार कोणतीही कारवाई करत नाही. म्हणून मी राहुल कुल चेअरमन असलेल्या भीमा पाटस साखर कारखान्याचे (Bhima Patas Sugar Factory) प्रकरण CBI कडे पाठवले आहे. मी वारंवार गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे या कारखान्याबाबत पत्रव्यवहार केला होता. पण त्यांनी याबाबत दुर्लक्ष केल्याचे राऊत म्हणाले. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यासाठी सीबीआयला मी पूर्ण सूट दिली असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते असे राऊत म्हणाले. म्हणून हे प्रकरण मी सीबीआयकडे पाठवले आहे. सध्या राज्याचे गृहमंत्री याकडं लक्ष देत नसल्याचे राऊत म्हणाले.


शेतकऱ्यांचे पैसे लुटणाऱ्यांना फडणवीसांनी पाठिशी घालू नये


उद्या संध्याकाळी पाच वाजता भीमा पाटस कारखाना परिसरात माझी सभा आहे. त्या सभेला मी उपस्थित राहणार असल्याचे राऊत म्हणाले. शेतकऱ्यांचे पैसे लुटणाऱ्यांना पाठिशी घालू नये असे आवाहन संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केले. अशा प्रकारामुळं राज्य भ्रष्टाचाराच्या विळख्यात जात आहे. राज्याची पत जात असल्याचे संजय राऊत म्हणाले. 


राज्यातील सरकार हे विकृत प्रवृत्तीचं


रिफायनरी सर्वेक्षणाच्या विरोधातील आंदोलनासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. सध्या 5 ते 6 हजार लोक तिथं जमा झाले आहेत. गोळ्या खाऊ पण तिथून जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पण उद्योगमंत्री सामंत पोलिसांना हाताशी धरुन आंदोलकांना धमक्या देत असल्याचे राऊत म्हणाले. हजारो बारसू ग्रामस्थांना तडीपारच्या नोटीसा बजावल्या जात आहेत. त्या ठिकाणी सामुदायिक हत्याकांड होण्याची शक्यता आहे. दडपशाही सुरु असल्याचे राऊत म्हणाले. राज्यातील सरकार हे विकृत प्रवृत्तीचं असल्याचे राऊत म्हणाले. 
 


महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut Complaint to CBI: भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात संजय राऊतांची CBI कडे तक्रार; 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप