शिर्डी : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळ खुली झाली असून साईबाबा (Saibaba) संस्थानने साईभक्तांसाठी दरवाजे उघडले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी ऑनलाईन पास घेणे अनिवार्य होते. आता लवकरच शिर्डीत ऑफलाईन पास सेवाही सुरू होणार असून दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने तयारी केली आहे. ऑफलाईन पास आणि भक्तांसाठी प्रसादालाय सुद्धा सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव शासनाला पाठवल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. 


 जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे सूचनेवरून साईदर्शनासाठी ऑनलाईन पास सक्तीचे करण्यात आले होते,  त्यामुळे अनेक भाविकांची गैरसोय होते तर ऑनलाईन पासच्या नावाखाली गोरखधंदा सुरू झाला आहे. संस्थानने पासचा गैरव्यव्हार करणा-या पाच जणांवर कारवाई केली असून पुढे देखील कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले आहे. 


साईबाबा मंदिरात दिवसाला 15 हजार पासेसची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली असून त्यामध्ये पाच हजार फ्री ऑनलाईन पद्धतीने, पाच हजार ऑफलाइन पद्धतीने (बायोमेट्रिक) तर पाच हजार पासेस सशुल्क पद्धतीने  देऊन दर्शन दिले जाते.  साईबाबांच्या सर्व आरतीचे पास ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहेत व यात प्रत्येक आरतीला फक्त 10 ग्रामस्थांसाह 90 भाविकांना उपस्थित राहता येते.


शिर्डी शहरातील आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या साईबाबांच्या मंदिराच्या इतिहासात प्रथमच साई मंदिर बंद करण्यात आले होते. गेल्या 19 ते 20 महिन्यांच्या कालावधीत साई मंदिर दोन वेळा बंद झाले. यामध्ये शहरातील अनेक छोट्या मोठ्या लोकांना आर्थिक फटका बसला आहे. मात्र आता मंदिर सुरू होणार असून साईबाबा संस्थान सज्ज झाले आहे.  


 शिर्डी साईमंदिर दर्शन नियमावली



  • दररोज 15 हजार भाविकांना दर्शन दिले जाते

  • दर तासाला 1150  भाविकांना दर्शन

  • साईबाबांची काकड आरती, माध्यान्ह आरती, सायंआरती आणि शेजारतीला 80 भाविकांना सशुल्क प्रवेश

  • प्रत्येक आरतीला 10 गावकऱ्यांना प्रवेश

  • 65 वर्षावरील नागरिकांना आणी 10 वर्षाच्या आतील बालकांना व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश नाही

  • साईभक्तांना कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक

  • साई मंदिरात फुल हार प्रसाद घेऊन जाण्यास मनाई