School Repoen in Maharashtra : कोरोनाचा जोर ओसरत असताना राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली आहे. जवळपास दोन वर्षानंतर आता राज्यातील शाळांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. पाल्यांना मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नसणार आहे. लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येणार आहेत.
शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होईल याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाने पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. राज्यातील काही ठिकाणी याआधीपासूनच चौथीपासून, सातवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टींमध्ये शिथिलता येत आहे. आता पहिली ते चौथी शाळा सुरु होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले होते. पहिली ते चौथी सर्व विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत. त्यांचे लसीकरण केले पाहिजे. 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे हा मुद्दा मांडला गेला आहे. पहिली ते चौथी शाळा सुरु करायला परवानगी द्यावी असंही त्यांनी म्हटलं होते. मात्र, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकार टास्क फोर्सच्या अहवालानंतर निर्णय घेणार आहे.
शहरी भागात पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास चाईल्ड टास्क फोर्सने हिरवा कंदील दिला होता. राज्य शासनाने इतर बाबींची पूर्तता केल्यास, शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचा चाइल्ड टास्क फोर्सचे म्हणणे आहे. चाईल्ड टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवला असला तरी शाळा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतरच होणार होता. अखेर आजच्या मंत्रिमंडळात याला मंजुरी देण्यात आली.
मार्गदर्शक सूचना तयार करणार
टास्क फोर्ससोबत चर्चा करून मार्गदर्शक सूचना तयार करणार असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारीसाठी आठ दिवसांचा वेळ घेतला आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात उद्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले. मागील अनुभव पाहता आरोग्यमय वातावरण सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी म्हटले. टास्क फोर्ससोबत चर्चा करून वेगळ्या मार्गदर्शक सूचना तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालक व इतर घटकांनीदेखील शाळा सुरू करण्यासाठीच्या सूचना द्याव्यात. त्यानुसार आपण मार्गदर्शक सूचना तयार करू असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले. मागील वेळेस शाळेत सुरू करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना सविस्तर आहेत. त्यानुसार पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले.