मुंबई : राज्यातील शाळा 15 जून पासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांच्या नुसार राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून पासून सुरू होणार आहे. शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही लस आणि बूस्टर डोस घेण्यासंदर्भात विभागाच्या स्तरावर कार्यवाही करावी असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे. 


काय आहेत सूचना?



  • 13 आणि 14 जून रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेत उपस्थित राहून स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे आवश्यक असून

  • 15 जून पासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे आहे.

  • विदर्भातील शाळांमध्ये 29 जून पासून विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेत बोलवायचे आहे.

  • शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही लस आणि बूस्टर डोस घेण्यासंदर्भात विभागाच्या स्तरावर कार्यवाही करावी.

  • वय वर्ष 12 व त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांची कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण याची व्याप्ती वाढवण्यावर भर द्यावा.

  • कोव्हिड योग्य वर्तनचे शाळा व शाळा परिसरात त्याचे पालन होईल याची दक्षता शाळा प्रशासनाने घ्यावी.

  • ज्या विद्यार्थ्याला ताप किंवा इतर कोरोना सदृश्य लक्षणे आढळत असतील तर त्या विद्यार्थ्यांना शाळेत पालकांनी न पाठवण्याचा सूचना शाळांनी द्यावा.

  • शाळेत अशा प्रकारचे लक्षणे आढळल्यास तातडीने अशा विद्यार्थ्यांना विलगीकरणाची व्यवस्था करावी.

  • ज्या विद्यार्थ्यांची कोरोनाना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे अशा विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजन  टेस्ट किंवा rt-pcr टेस्ट  करावी.

  • शालेय विद्यार्थ्यांचे वेळोवेळी कोरोना प्रादुर्भावाचे अनुषंगाने प्रबोधन शाळा स्तरावर करावे.


राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत. आदेशात शैक्षणिक सत्र 2022 - 23 सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.  शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून पासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जून पासून सुरू होणार असल्याचं या निर्देशात म्हटलं आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपासून तर विदर्भातील विद्यार्थ्यांनी 27 जूनपासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


शाळा जरी 13 जून रोजी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं आहे. 13 आणि 14 जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटलं आहे. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंघाने प्रबोधन करावं असं देखील आदेशात म्हटलं आहे.