मुंबई : काल केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पत्रकार परिषद पाहताना लक्षात आलं की पोलिसांना हव्या असलेल्या संशयिताची माहिती त्यांना आहे. महत्त्वाची माहिती लपवली जाऊ नये. महाराष्ट्र सरकार हे कायद्याप्रमाणे काम करत आहे. कायदा आपलं काम करत असून त्याला कोणीही अतिशहाणपणा शिकऊ नये असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. 


खासदार संजय राऊत म्हणाले की, "पोलिसांना एखाद्याची माहिती हवी असल्यास ती न देणं हे चुकीचं. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं धोरण हे चुकीचं. नोटीस कुणाला पाठवायचं हे कायदा विभागाचं काम आहे."


कायद्याला सहकार्य करणे हे सर्वांचे कर्त्यव्य आहे. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी कायद्याला सहकार्य करावं असं खासदार संजय राऊत म्हणाले.


गुन्हेगार पाताळात जरी गेला तरी पोलीस शोधतील
गुन्हेगार पाताळात जरी लपला असाल तरी महाराष्ट्राचे पोलीस त्याला शोधतील असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला. केंद्रीय मंत्र्यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करण्यात येत असून महाविकास आघाडीच्या नेत्यांना कशा प्रकारचा त्रास होतोय हे माहिती आहे. केंद्र सरकारने अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींना तुरुंगात टाकलं.  हे आम्ही सहन करतोय असंही खासदार संजय राऊत म्हणाले. 


दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून आमदार नितेश राणे यांच्याबाबतची माहिती देण्याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.  नितेश राणे यांच्यावर शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र ते पोलिसात हजर झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे. त्याबाबत नारायण राणे यांना पत्रकारांनी विचारलं असता, नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का असं म्हटलं होतं. त्यावरुनच आता कणकवली पोलिसांनी नोटीस पाठवून नारायण राणे यांनी नितेश राणे यांची माहिती द्यावी असं म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :