मुंबई : महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेल्वे खात्यावर टिकास्त्र डागलं आहे. सगळ्या गाड्यांसाठी मजुरांची यादी मागणं हा आडमुठेपणा असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. तसेच मजुरांबाबतच्या योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावरही बाळासाहेब थोरात यांनी टिका केली आहे. आईने काळजी घेतली नाही, म्हणून मावशीने घेतली; असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर प्रत्त्युत्तर दिलं आहे.


परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यास तयार, मजुरांची यादी द्या असं ट्वीट केलं. यानंतर ट्विटरवर शाब्दिक युद्ध सुरु झालं. त्यानंतर याप्रकरणी प्रतिक्रीया देताना महसुल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'याआधी ज्या याद्या पाठवल्या गेल्या, त्यावेळी गाड्यांचा आकडा आल्यानंतर आपण आदल्या दिवशी याद्या पाठवल्या होत्या. आता आपण 157 गाड्यांची मागणी केंद्राकडे केली आहे. त्यातल्या 115 गाड्या मुंबईच्या आहेत. आता रेल्वे मंत्रालय म्हणतयं की, सगळ्या 157 गाड्यांची यादी आम्हाला आताच पाहिजे. अशी आवश्यकता नाही. आदल्या दिवशी आपण यादी देत असतो. त्याप्रणाणे काम व्यवस्थित होत असतं. त्यांनी जादा गाड्या द्याव्यात आपण ज्यादा याद्या देवू. पण सगळ्या गाड्यांसाठी मजुरांची यादी मागणं म्हणजे, आडमुठेपणाचं धोरण रेल्वे मंत्रालयानं स्विकारल्याचं दिसत आहे.'


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परप्रांतिय मजुरांसंदर्भात एक वक्तव्य केलं असून सध्या या वक्तव्यामुळे राजकारण तापल्याचं दिसत आहे. 'सावत्र आई म्हणून जरी तुम्ही आमच्या मजुरांना मदत केली असती, जेवू घातलं असतं तरी अशी वेळ आलीच नसती.', असं योगी आदित्यनाथ म्हणाले. यासंदर्भात बोलताना महसुल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'योगी आदित्यनाथ यांच्याकडून ही अपेक्षा नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे. खूप मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेशचे मजूर येथे आहेत. या उभारणीमध्ये त्यांचा वाटाही आम्ही कधी नाकारलेला नाही. ते काम करतात ही वस्तुस्थिती आहे. श्रमाचे दाम आपण देतोय, हे देखील खरं आहे. परंतु, तरिदेखील योगी आदित्यनाथ यांनी केलेला आरोप योग्य नाही.'


बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'लॉकडाऊन सुरु झाल्यापासून दोन महिने आपल्या प्रशासनाने, आपल्या स्वयंसेवी संस्थांनी, आपल्या राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळलं. त्याबाबत कोणाचीही तक्रार नाही. ज्यावेळेस त्यांना पाठवण्याची वेळ आली, त्यावेळीही सन्मानाने पाठवलं आपण. त्यांच्या गाड्यांची व्यवस्था, त्यांच्या तिकीटाची व्यवस्था, त्यांना प्रवासासाठी जे दोन दिवस लागणार आहेत. त्यावेळी त्यांच्या जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था, महाराष्ट्रातील लोकांच्या वतीने करण्यात आली होती.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'योगी आदित्यनाथ यांनी उच्चारलेला सावत्र आई हा शब्द बरोबर नाही. आईनं त्यांना सांभाळलं नाही, मावशीनं त्यांना सांभाळलं. आपल्या महाराष्ट्रात एक म्हण आहे, माय मरो पण मावशी जगो. त्यामुळे आता पुढेही मावशीचं सांभाळणार आहे आणि ती काळजी आम्ही निश्चितच घेऊ.'


'उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर तिथल्या सरकारची परवानगी घ्यावे लागेल', असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'लॉकडाऊनंतर निश्चितच काही गोष्टी बदलणार आहेत. पण आम्ही परप्रांतिय मजुरांना नेहमीच योग्य पद्धतीने वागणूक दिली आहे. त्यांनीही काम केलं आहे. शेवटी देश एकच आहे आणि सर्व नागरिक देशाचे आहेत. दोन महिने लॉकडाऊन आहे. मजुरांचे कुटुंबिय तिकडे अडकले आहेत. शेवटी त्यांना घराची ओढ लागणारचं.'