Raosaheb Danve : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. दानवे यांनी नववर्षाच्या सुरुवातीला राज्यातील मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाची थाप टाकली आहे. ते म्हणाले की, 'शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही, मी आग लावलेली नाही. एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते आहेत, मनातली ईच्छा ते बोलले नाहीत. एकनाथ शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात याचा मला विश्वास आहे.' असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये म्हटलं आहे. मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी होण्यास वेळ लागत असेल तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व का सोपवत नाहीत?, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला. त्यांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना खासदार रावसाहेब दानवे म्हणले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही काळ आजारातून बरे झाले नाहीत तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला पाहिजे. ते हे पद सांभाळण्यास सक्षम आहेत. मी शिवसेनेत आग लावण्याचे काम करत नसून उद्धव ठाकरे नंतर शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हेच नेते आहे. एक सक्षम नेतृत्व म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहतो. शिवसेनेवर निशाणा साधत रावसाहेब दानवे यांनी पुन्हा खिजवन्याचे काम केलं आहे. मुख्यमंत्री काही काळ आजारातून बरे झाले नाहीत, तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला पाहिजे असा पुनरुच्चारही दानवे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. ते बरे व्हायला काही दिवस तरी लागतील. अशावेळी विनाप्रमुखांचं राज्य कसे चालेल? असा प्रश्न रावसाहेब दानवे यांनी विचारला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यांना बरं व्हायला आणखी काही दिवस लागतील. मुख्यमंत्री आजारातून लवकर बरे व्हावेत, अशी माझी आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांनी या राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध व्हावं, असं आमचं मत आहे. पण मुख्यमंत्री आजारी असताना हे राज्य कसं चालेल? एकनाथ शिंदेंसारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नाही. एकनाथ शिंदे यांनाच नव्हे कुणालाही द्या, राष्ट्रवादीला द्या, अजित पवारांना द्या. संधी दिली पाहिजे,असंही रावसाहेब दानवे यांनी सूचना केली.