मुंबई : "वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या" असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) वाढदिवसानिमित्त मनसैनिकांना आवाहन केले आहे. सोशल मीडियावर एक ऑडिओ पोस्ट करत राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे.
शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 जूनला वाढदिवस आहे. दरवर्षी राज ठाकरेंना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येतात. मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा होतो. पण सध्या राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती परंतु त्यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलली. ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात होणार आहे. या मुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हणाले ऑडियो पोस्टमध्ये ?
राज ठाकरेंनी सोशल मीडियावर ऑडियो पोस्ट करत कार्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन केले आहे. आपल्या ऑडियो पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, "14 तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया रद्द झाली. आता ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार आहे. आता पुन्हा तोच प्रकार नको म्हणून यावेळी वाढदिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या", असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
टेनिस खेळताना दुखापत
मध्यंतरीच्या काळात टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार उद्या लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडेल.
अयोध्या दौरा स्थगित
राज ठाकरे 15 दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते. हे दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचं जाहीर केलं. येत्या 5 जून रोजी राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अयोध्या दौऱ्याला जाणार होते. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली. परंतु पायाचं दुखणं अधिकच वाढल्याने डॉक्टरांनी शस्त्रकियेचा सल्ला दिला. परिणामी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.