Maharashtra New Governor 2023 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज राजभवन परिवारातर्फे हृद्यपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना नुकतेच पदमुक्त करण्यात आले. त्यांचा महाराष्ट्रातील 3 वर्ष, 5 महीने आणि 12 दिवसांचा प्रवास थांबला. शनिवारी रमेश बैस यांचा शपथविधी पार पडणार आहे. 


महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी (दि. 16) राजभवन येथे भावपूर्ण न‍िरोप देण्यात आला. यावेळी राज्यपालांचे प्रधान सच‍िव संताष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला. शुक्रवारी (दिनांक 17) राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर  ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.


शनिवारी रमेश बैस यांचा शपथविधी - 


महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस हे पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यांचा शपथविधी समारंभ शनिवारी (18 फेब्रुवारी 2023 ) दुपारी 12.40 वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे. रमेश बैस यांचं शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील.


कोण आहेत रमेश बैस ?


नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी याआधी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिलेय. संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा त्यांना तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव आहे. बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत. 1978 साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन 1980 ते 1985 या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले.  सन 1982 ते 1988 या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.