Maharashtra Rains : राज्याच्या (Maharashtra) विविध भागात शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rain)हजेरी लावली. या दरम्यान झाडं कोसळण्याचा तसंच विजेते खांब उन्मळून पडल्याच्या अनेक घटना घडल्या. झाडं आणि विजेचे खांब पडल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित (Power Supply) झाला होता. सोबतच पिकांचे मोठं नुकसान झालं. तसंच पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. जाणून घेऊया वादळी वाऱ्यासह पावसाने हजरे लावल्याने कुठे-कुठे नुकसान झालं? 


तुफान वादळी वारे शंभर वर्षांपूर्वीच टाकळसिंग गावात पडलं झाड


बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात काल अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह आणि गावात पाऊस झाला यामध्ये आष्टी तालुक्यातील टाकळसिंग गावातील दर्ग्यात असलेलं शंभर वर्षांपूर्वीच वडाचे झाड अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यात ठिकठिकाणी घरावरील पत्रे उडाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर देऊळगाव घाट, मराठवाडी, मंगरुळ, केळ, टाकळसिंग यांसह जवळपास 15 ते 20 गावांना वादळाचा तडाखा बसला आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. आष्टी शहरातील मुर्शदपूर भागात माऊली मंदिरात सुरु असलेल्या अखंड सप्ताहाचा मंडप फाटला आहे. 


वादळाने लग्नात आणले विघ्न, परभणीच्या मानवतमधील प्रकार 


काल सर्वत्र जोरदार वादळी वारे सुटले होते. या वादळी वाऱ्याने परभणीच्या मानवतमधील एका लग्नात विघ्न आणले. मात्र हे विघ्न वऱ्हाडींनी दूर केले. वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप अक्षरशः उडून जात होता. हा लग्न मंडप लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडींनी धरुन ठेवला. मानवत तालुक्यातील आटोळा येथे पंडित आणि भाले या परिवाराचा मंगल परिणय होता. मात्र दुपारी अचानक वादळी वारे सुटल्याने वऱ्हाडींना उडून जाणारा मंडप धरुन ठेवावा लागला.


वादळी वाऱ्यांमुळे नंदुरबारमधील केळी बागांचे प्रचंड नुकसान


नंदुरबार जिल्ह्यात काल आलेल्या वादळीवाऱ्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अनेक भागात शेकडे हेक्टरवरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत तर अनेक भागात विजेचे पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी नवीन लागवड केलेल्या पपई आणि मिरचीच्या रोपांना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे रोपांमध्ये मर पडण्याची भीतीही शेतकऱ्यांमध्ये आहे. काल हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातल्या सर्व भागात जोरदार हवा आणि काही ठिकाणी पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे काढणीसाठी आलेल्या केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहादा आणि तळोदा तालुक्यात या नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आधीच अवकाळी पाऊस आणि इतर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता वादळीवाऱ्याचे संकट निर्माण झालं आहे. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या केळीच्या शेतांचे आणि इतर नुकसानीचे शासनाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.


नागपुरातील हिंगणामध्ये जोरदार वादळामुळे मोठे ट्रकही उलटले


नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील एमआयडीसी परिसरात काल संध्याकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमध्ये अनेक कंपन्यांची छतावरील पत्रे उडून गेली. या परिसरात उभे असलेले मोठे ट्रक आणि ट्रेलर सुद्धा या वादळात उलटले.


सोलापुरातील माळशिरसमध्ये मोबाईल टॉवर कोसळला 


सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील गिरवी इथे वादळी वाऱ्याने मोबाईलचा टॉवर कोसळला असून इलेक्ट्रिक पोलही उन्मळून पडले आहेत तर अनेक ठिकाणी तारा तुटल्या असल्याने मोठे नुकसान झाले आहे. या झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.


पावसामुळे सांदण दरीत अडकलेल्या पर्यटकांची सुखरुप सुटका


काल संध्याकाळी अचानक आलेल्या वादळ आणि पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील सांदण दरीत पर्यटक अडकले. 500 पर्यंटकाना वाचवण्यात यश आलं. दरीमध्ये पाण्याचा ओघ वाढल्याने पर्यटकांना बाहेर पडणं मुश्लिक झालं होतं. यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. 


शहापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, झाड पडून दोघे जखमी


ठाणे जिल्ह्यातील शहापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने एक भले मोठे झाड रस्त्यावर पडले आहे. या दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी झाले असून एका गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच विजेचे पोल पडून वायर तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. शहापूरातील यमुनानगरसह अनेक भागात वादळी, वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने फळांची दुकाने उडून गेल्यामुळे फेरीवाल्यांचे खूप नुकसान झाले आहे. अनेक भागात सोसायटीच्या वाऱ्याने झाडे, विद्युत महावितरणचे पोल, घरावरील छप्पर देखील उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.


इंदापूरमध्ये आठवडे बाजारात लिंबाचं झाड कोसळलं


इंदापूरमधील आठवडे बाजारामध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लिंबाचं झाड कोसळ्याची घटना घडली. इंदापूर नगरपरिषदेच्या पाठीमागे आठवडे बाजार भरतो. या रविवारी देखील हा बाजार भरला होता. दरम्यान दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास इंदापूर शहरात मोठा सोसाट्याचा वारा सुटला आणि भाजीपाला विक्रेते आणि खरेदीदार यांची खूप मोठी दैना उडाली. अशातच इंदापूर नगरपरिषदेच्या पाठीमागे असणारे भले मोठ्या लिंबाच्या झाडाचा कडाडून आवाज झाला आणि भाजीपाला विक्रेत्यांच्या अंगावर कोसळलं. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून स्थानिकांच्या मदतीने या लिंबाच्या झाडाखाली सापडलेल्या भाजीपाला विक्रेत्या महिलांना वाचवण्यात यश आलं.


वाशिममध्ये लग्न समारंभाला फटका


वाशिम जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाचा वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील रुई इथे लग्न समारंभाला फटका बसला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप हवेत उडायला लागला. त्यामुळे लग्न मंडपातील वऱ्हाडी मंडळाची मोठी तारांबळ उडाली.


बुलढाण्यातील देऊळघाटात वादळी वाऱ्याचा लग्न मंडपाला तडाखा


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी दुपारी अचानक मान्सून पूर्व जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झालं. बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट या ठिकाणी गावाबाहेरील एका शाळेत लग्न सुरु होतं. त्याठिकाणी लोक जेवण करत असताना अचानक तुफान वादळ आलं, या वादळात लग्नाचा शामियाना उडून गेला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लग्न स्थळी एकच धावपळ उडाली होती आणि लोक सैरावैरा धावू लागले. या वादळी वाऱ्यामुळे मंडपवाल्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


अमरावतीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी


मागील आठवड्याभरापासून अमरावती जिल्ह्यातील तापमान 43 अंश सेल्सिअसवर होतं. कालही मान्सूनपूर्व पावसाने अमरावती शहरासह अनेक तालुक्यात हजेरी लावली. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने अनेक दिवसांपासून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.


जालन्यात वादळी वाऱ्यामुळे नगरपंचायतीचा फलक कोसळला


जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात वादळी वाऱ्यामुळे नागरपंचायतीचा फलक आणि काचेची फ्रेम कोसळली, सुदैवाने खाली असलेली लोक वेळीच सावध झाल्याने अनर्थ टळला तर दुसरीकडे जालना शहरात अचानक आलेल्या वादळाने आठवडी बाजारात भाजीविक्रेत्यांची एकच धांदल उडाली. दुपारी दोन नंतर जालना, बदनापूर इथे जोरदार वादळ आलं. या वादळाने दैनंदिन जीवन काही काळ विस्कळीत झाले होते.