Maharashtra Rains : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. मुंबईत पावसानं उघडीप दिल्यामुळं उष्णतेत वाढ झाली होती. मात्र, रात्री पाऊस झाल्यानं हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच दोन दिवसाच्या उघडीपीनंतर लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, येत्या चार दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मुंबईत काही दिवसांपासून अतिशय उष्ण, दमट हवामान होते. अकेर रात्री पाऊस झाल्यामुळं हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईत आणखी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांरा आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशानाकडून करण्यात आलं आहे.
लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेती पिकांना फटका
लातूर जिल्ह्यात आषाढी एकादशीपासूनच पावसानं चांगलाच जोर धरला आहे. मागील दोन दिवसाच्या उघडीपनंतर काल जिल्हाभरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. औसा आणि निलंगा तालुक्यातील काही ठिकाणी कमी वेळात तुफान पावसाची नोंद झाली आहे. औसा तालुक्यातील अपचुंदा ,तपसेचिचोली, लामजना, मंगरुळ शिवारात कमी कालावधीत तुफान पाऊस झाला आहे. तर निलंगा तालुक्यातील शेडोळ शिवारात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळं शेडोळ आणि लामजना शिवारात सर्वाधिक नुकसान झालं आहे. या भागातील ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. या भागातील अंतर्गत रस्त्यावर असणारे छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. चार दिवसापूर्वी या भागात असाच पाऊस झाला होता. पुलावरुन पाणी वाहत असताना एक दुचाकीस्वार वाहून गेला होता.
राज्यातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी मात्र, अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. तसेत दुसरीकडे अनेक नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहे. विशेषत: मराठवाडा (marathwada ) आणि विदर्भाला (Vidarbha) या अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसला आहे.