Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Aug 2022 02:45 PM
हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

हिंगोली जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसाने शेतीचे नुकसान होणार आहे. दुपारीच जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. हळद, कापूस, तूर, मूग, सोयाबीन पिकाला या पावसाचा फटका बसणार आहे. अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर अचानक जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

गुहागर तालुक्यामध्ये कोतळूक कासारी नदी प्रथमच पात्राबाहेर

रत्नागिरी जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे गुहागर तालुक्यामध्ये कोतळूक कासारी नदी प्रथमच पात्राबाहेर आली आहे. नदी लगतची भात शेती पाण्याखाली गेली आहे. आरे येथेही पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळं वाहतूक बंद झाली आहे. 

7 ते 11 ऑगस्टदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

7 ते 11 ऑगस्ट दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे वादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. 8 ते 10 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुहागरमध्ये मुसळधार पाऊस, पालशेत बाजारपेठेत शिरलं पुराचं पाणी
Ratnagiri Rain : गुहागरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे पालशेत बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. तर साखळी त्रिशूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाल्यामुळे गावाचा संपर्क तुटला.

अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. गटाराचे पाणी थेट दुकानात शिरुन शृंगारतळीत व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

 
गुहागरमधील साकरी पुल पाण्याखाली
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुहागरमधील साकरी पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे साकरी गावात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्याचबरोबर लागलेली शेतीही पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आहे.. 
चिपळून तालुक्यातील दहिवली खरवते सीमेवरील पूल पाण्याखाली, 10 गावांचा संपर्क तुटला

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं चिपळून तालुक्यातील दहिवली खरवते सीमेवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळं तेथील दहा गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

गुहागरच्या आरेगाव राममंदिर परिसरात पाणीच पाणी
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आरेगाव राममंदिर परिसरात पाणीच पाणी साचले आहे. आज सकाळपासूनच पावसाने अक्षरशः गुहागर तालुक्याला झोडपून काढले आहे. सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील आरेगावच्या मंदीर परिसरात पाणीच पाणी झाले आहे.


रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शृंगार तळी येथील दुकानात शिरलं पाणी
कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसानं हाहाकार घातला आहे. गुहागर तालुक्यातील शृंगार तळी येथील दुकानात पाणी शिरलं आहे. या दुकानामध्ये विजेच्या उपकरणापासून ते टीव्ही, फ्रीज यापासून किंमती वस्तू ही या दुकानात आहेत. बाजारपेठेतील दुकानात पाणी आल्यानं दुकानदारांची धावपळ उडाली आहे. दरम्यान गुहागर असगोली रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

 
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यासह गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यासह गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं बोरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बोरी नदीला पूर आला आहे. बोरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळं प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बोरा नदीच्या पुरामुळे तामसवाडी येथील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.  
दापोलीत पावसाचा जोर वाढला, वाहतुकीवर परिणाम
दापोलीत पावसाचा जोर वाढला असून सध्या सखल भागांत पाणी साचत आहे. तर तालुक्यातील अंतर्गत गावात जाणाऱ्या पुलावरुन पाणी जात असल्याने तालुक्यातील बाजारपेठेत येण्याचे मार्ग बंद झाला आहे. दापोली तालुक्यातील करजगाव येथील जानेश्वरवाडी व मधलीवाडी मार्गावरील पुलावर पाणी आले आहे.  
पुढील तीन दिवस कोकणसह राज्यात अतिवृष्टीचा इशारा

पुढील तीन दिवस कोकणसह राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

गोसीखुर्द धरण क्षेत्रात पावसाचा सुरुवात, धरणाच्या 13 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु

Gondia Rain : गोसीखुर्द धरण पानलोट क्षेत्रात पावसानं पुन्हा हजेरी लावताच धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 13 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. या 13 दरवाज्यातून 1 हजार 576 क्युमेक्से पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विशेष म्हणजे धरण नियंत्रित असल्याने प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला असला तरी मात्र नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग

Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणातून आज सकाळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणातून 190 क्युसेकनं नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळं नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला

चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतूकीसाठी बंद करण्याची शक्यता आहे. पावसात दरड, माती खाली येऊन अपघात होऊ नये म्हणून घाट बंद होण्याची शक्यता आहे.

दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर पावसाची हजेरी, राधानगरी धरण 77 टक्के

दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर काल कोल्हापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळं राजाराम बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. धरण क्षेत्रातील दमदार पावसामुळे पंचगंगेसह सर्वच नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या शहर आणि परिसरात पावसानं उघडीप दिली आहे. धरण क्षेत्रातील पावसानं विश्रांती दिली आहे. राधानगरी धरण 77 टक्के भरले आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच मुंबई शहरासह उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain Update ) अंदाज भारतीय हवामान विभागाने  वर्तवला आहे. 
 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रांकडून परिस्थिती आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी माहिती दिली. दरम्यान, सध्या राज्यातील विवध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईतही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.


मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार  


मुंबईत 7 आणि 8 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 9 आणि 10 ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.