Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा फटका

Maharashtra Rains Live  : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Jul 2022 03:00 PM
Nagpur Rain: बुधवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात

नागपूरः गेल्या आठवड्यात मंगळवार ते शुक्रवार सोडले तर दररोज काही न काही प्रमाणावर नागपुरात पावसाने हजेरी लावली. मात्र आज बुधवारी दुपारनंतर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात पावसामुळं आत्तापर्यंत 45 जणांचा मृत्यू

Marathwada Rain : अतिवृष्टी, पूर आणि वीज पडल्याच्या घटनांमध्ये मराठवाड्यात आत्तापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानं याबाबतची माहिती दिली आहे. तर या पावसामुळं शेतीच्या पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 728.40 मिलिमीटर पाऊस

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 728.40 मिलिमीटर पाऊस झाला आहे.  तर गेल्या 24 तासात सरासरी 19.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग

Beed Rain : सध्या जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु आहे. जायकवाडीतून 20453 क्युसेक ने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडले आहे. राक्षस भुवनच्या शनी मंदिराजवळ गोदावरी नदीचे पाणी पोहोचले आहे. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे एका फुटाणे उघडले आहेत, त्यामुळं गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदी पात्रातील याच पाण्यामध्ये पांचाळेश्वराचे आत्मतीर्थ मंदिर अर्धे पाण्यात बुडाले असून, राक्षस भुवनमधल्या शनी महाराजांच्या मूर्तीजवळ आता हे पाणी पोहोचले आहे.

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Rain : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. लातूरसह औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे.  दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Rains Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक गांवाचा संपर्क तुटला


लातूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. लातूर उदगीर मार्गाचे काम सध्या सुरु आहे. यामुळं अनेक ठिकाणी पर्यायी पूल बांधण्यात आले होते. कालपासून पडत असलेल्या पावसामुळे चांभरगा गावाजवळील लहान ओढ्यात पाणी आल्याने सिमेंटचे मोठे पाईप टाकून बांधण्यात आलेला पर्यायी पुल देखील वाहून गेल्याचे समजते. नरसिंगवाडी पाटी येथील पर्यायी पूल पावसामुळे वाहून गेला आहे. यामुळे हा रस्ता बंद असून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे उदगीरसह चामरगा, बावलगाव, जंगम वाडी, वेरूळसह अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.


औरंगाबादमध्येही जोराचा पाऊस


औरंगाबाद जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. खुलताबाद तालुक्यात पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा गाव आणि परीसरात  झालेल्या पावसाने  गावाजवळील पूल वाहून गेल्यानं तब्बल सहा गावांचा संपर्क तुटला आहे. कसाबखेडा गावाशी  माटेगाव,चांभारवाडी, देभेगाव, देवळाणा, पिंपळगाव या गावातील लोकांचा दैनदीन व्यवहार असल्यानं दररोजचा संपर्क आहे. कसाबखेडा परीसरातील अनेक शेतकरी शेतात वास्तव्यास आहेत. गावात शाळा, बँक, दवाखाने आणि मोठी बाजारपेठ आहे. कसाबखेडा परीसरातील शेतकरी आणि माटेगाव, चांभारवाडी, विटखेडा,देभेगाव ,देवळाना पिंपळगाव या गावातील लोकांची वर्दळ गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील पुलावरुन होत असते. मात्र, मुसळधार पावसामुळं नळकांडी पूल वाहून गेला आहे. त्यामुळं या गावातील नागरीकांच्या दळणवळणाची मोठी समस्या निर्माण होऊन कसाबखेडा गावाशी संपर्क तुटला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.