Maharashtra Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. राज्यातील कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील चार ते पाच दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


हवामान विभागानं राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असला तरीही राज्यात सध्या पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागातच पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाडून करण्यात आलं आहे.  


गोंदिया जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी


गोंदिया जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळं नदी-नाल्यांसह धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार काल दिवसभर देखील पावसाचा जोर कायम होता. त्यामुळं नदी नाले दुधडी भरून वाहू लागले आहेत. अशातच नदीपात्रातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशी आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोसीखुद्र धरणाचे दरवाज उघडले


भंडारा जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे. तर काही भागात हलका तर कुठं रिमझिम पाऊस सुरू आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळं जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह तिला जोडलेल्या उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळं नदी काठांवर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि नदी नाल्यांना आलेल्या पाण्याची पातळी बघायला कुणीही जावून जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तसेच गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 


अहमदनगर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस


पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीदेखील अहमदनगर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळं भर पावसाळ्यात जिल्ह्यात पाणी टंचाई सुरु झाली आबे. अहमदनगर जिल्ह्यात 57 टँकरद्वारे 60 गावातील 344 वाड्यावस्त्यांमध्ये पाणीपुरवठा केला जातोय. जवळपास सव्वा लाख नागरीकांना भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. 


 धरणांच्या, नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट 


राज्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. त्या भागात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तिथं शेती कामांना वेग आला आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही, त्याठिकाणी धरणांच्या, नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. काही भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, तिथं धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nagpur Rain : नागपुरात मुसळधार पाऊस, अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो; हिंगणा भागात वेणा नदीला पूर