Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून, पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. अशातच राज्यातील काही ठिकाणी परतीच्या पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. तसेच राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात देखील पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा हे जिल्हे वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
परतीचा पावसानं शेतकरी चिंतेत
राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. काही भागात परतीचा पाऊस कोसळताना दिसत आहे. या परतीच्या पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकरी मात्र चिंतेत आहेत. कारण या पावसामुळं हाताशी आलेली पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, सध्या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु आहे, अशातच पावसानं हजेरी लावल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नांदेड (Nanded) आणि परभणी (Parbhani) जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा मोटा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे.
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.
आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद
सुरुवातीला जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात तुफान पाऊस झाला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरीपेक्षा 23 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याचे पाहायला मिळालं. यामुळं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: