Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे, तर काही जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं (IMD) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणसह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  


राज्यात चांगाल पाऊस सुरु झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळं शेती कामांना गती येणार आहे. तर काही भागात अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. पाहुयात राज्यात कुठे कुठे पावसानं हजेरी लावली आहे.   


मुंबईत जोरदार पाऊस


गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. काही भागात पावासामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.  


बुलढाणा


बुलढाणा जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतीच्या कामाला यामुळं वेग मिळणार आहे. पावसाच्या आगमनामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. 


गोंदियात पावसाची रिपरिप, पुढील तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भात सक्रियपणे पुढे सरकत आहे. गोंदिया जिल्ह्यात पुढील दोन दिवस ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु राहणार आहे. सध्या पावसाची रिपरिप सुरु आहे. गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  


भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून भंडाऱ्यात दोघांचा मृत्यू 


भंडारा जिल्ह्यात वीज अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  भंडारा तालुक्यातील वाघबोडी गावाच्या शेतशिवारात ही घटना घडली. यादवराव अर्जुन शहारे (65), विद्यानगर भंडारा आणि रमेश श्रावण अंबादे (52) रा. वाघबोडी अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही जोरदार पाऊस सुरु झाल्यानं त्यापासून बचाव व्हावा म्हणून शेतातील झाडाखाली उभे होते. यावेळेस अचानक वीज कोसळल्यानं त्यांचा मृत्यू झाला.


रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस


गेल्या तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसामुळं परशुराम घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळं काही काळा वाहतुकीवर परिणाम झाला होता.  


जालना जिल्ह्यात पावसाची हजेरी


जालना शहर आणि परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. चांगला पाऊस सुरु झाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शेती कामांना वेग येणार आहे. 


भिवंडीत पावसामुळे भिंत कोसळली  


भिवंडीत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तर दुसरीकडे पांजरापोळ परिसरात एका जीर्ण इमारतीची संरक्षण भिंत अचानक कोसळली आहे. या दुर्घटनेत ही भिंत एका ट्रकवर कोसळल्यानं ट्रकचे नुकसान झाले असून मोठी दुर्घटना टळली आहे. तर देवजीनगर परिसरात एका यंत्रमाग कारखान्यावर झाड पडले आहे. 


विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता


नागपूर हवामान विभागाने 27 आणि 28 जूनसाठी विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळं येत्या दोन दिवसात मान्सून गतिमान होऊन विदर्भात शेतीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगढवर केंद्रित झाला आहे. त्यामुळं पुढील दोन दिवस पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा तर पश्चिम विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. 28 जूननंतर कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशावर स्थिरावेल. तेव्हा पश्चिम विदर्भात मान्सूनची दमदार हजेरी पाहायला मिळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


IMD Rain Update : उत्तर भारतात जोरदार पाऊस, हिमाचलसह उत्तराखंडमध्ये ढगफुटी; आजही मुसळधार पावसाचा इशारा