Maharashtra Rain Updates Live : राज्यात पावसाचा जोर कमी, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

 Maharashtra Rain Updates Live : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, मुंबईसह परिसरात चांगल्याच पावसानं हजेरी लावली आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Aug 2022 11:21 AM
अर्जुनी मोरगावमध्ये पावसामुळं घर कोसळलं
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव शहरात सततच्या पावसानं एक घर अचानक कोसळल्याची घटना घडली. हे घर कोसळण्याचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या जिल्हाभरात सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. विशेषबाब म्हणजे या रिकाम्या घरात कुणीही रहात नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. 
पुणे-मुंबई लोहमार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली

पुणे-मुंबई लोहमार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. यावेळी ही दरड रेल्वेच्या एका इंजिनवर पडली आहे. पण सुदैवाने या इंजिनला बोगी नव्हत्या. त्यामुळं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंकीहील स्टेशनजवळ मध्यरात्री तीन वाजता ही घटना घडली. मिडल लाईनवरून हे इंजिन लोणावळ्यातून कर्जतच्या बाजूने निघालं होतं. त्याचवेळी अचानकपणे मोठ्या दरडी खाली कोसळल्या. या इंजिनवर येऊन पडल्या. आता दरड हटवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. मिडल लाईनवर ही दरड पडल्याने, अप आणि डाऊन लाईनच्या वाहतुकीला कोणतीही बाधा पोहचलेली नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Updates Live : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, मुंबईसह परिसरात रात्रभर जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  राज्यात कोकणसह, पूर्व विदर्भ, उत्तर आि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण समाधनाकारक राहिले आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुले आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.   


मराठवाड्यात मोठं नुकसान 


मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, पशुधनाचे आणि विशेषत: घरांचं मोठं नुकसान झालं आहे. महसूल यंत्रणा व कृषी विभागाकडून बहुतांश पंचनामे सुद्धा करण्यात आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद विभागामध्ये 1 जुन ते 19 ऑगस्ट 2022 दरम्यान 570.80 मि.मी. पाऊस पडला असून सरासरी पाऊसाच्या तुलनेत 130.11 टक्के इतका पाऊस पडलेला आहे. एकूण 52 दिवसामध्ये हा पाऊस पडलेला आहे. औरंगाबाद विभागात एकूण 450 महसूल मंडळे असून त्यापैकी 207 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. औरंगाबाद विभागात सरासरी खरीप पेरणी क्षेत्र 48.57 लाख हेक्टर असून सन 2022-23 मध्ये 47.99 लाख हेक्टर क्षेत्रावर 98.80 टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकाची 2450056.42 हेक्टर क्षेत्रावर व कापूस पिकाची 1372886.82 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. औरंगाबाद विभागामध्ये जुन ते जुलै 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे एकुण 8,11,845 शेतकरी बाधित झालेले असून 5,87,466.41 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 
 
नागपूर जिल्ह्यातही शेतीचं मोठं नुकसान 


जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात 2 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 1.14 लाख हेक्टरमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, धान व इतर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला होता. संततधार पाऊस ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याअखेरपर्यंत सुरू होता. या मुसळधार पावसामुळे पुन्हा 82,936 हेक्टरमधील पीक खराब झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे. 
सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत हे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सुमारे 70 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. संत्रा, मोसंबी या फळबागांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आलेला नाही, त्याचा समावेश करण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.