Maharashtra weather News : शेतकर्‍यांसाठी एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. शेतकरी बांधवांना येत्या दोन दिवसांमध्ये शेतातील सर्व कामे उरकून घ्यावीत, असे आवाहन हवामान अभ्यासकांनी केलं आहे. कारण येत्या दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान राज्यभरामध्ये  जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख  (Panjabrao dakh) यांनी व्यक्त केलाय. तसेच जायकवाडी धरण ही 100% भरणार असल्याचेही डख यांनी सांगितले आहे.


जायकवाडी धरण शंभर टक्के भरणार


पंजाब डख यांनी आज एक हवामान अंदाज व्यक्त केला असून ज्यानुसार शेतकऱ्यांनी उसाला खत टाकणे, उडीद मूग काढून घेणे, असे कामे करून घेण्याचे सांगितले आहे. कारण राज्यातील जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये 2 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.  तर तो पाऊस 6 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. पावसाची सुरुवात विदर्भातून होणार आहे. या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ते पाणी जायकवाडी धरणात येणार आहे. सध्या जायकवाडी धरण 70 टक्के भरले असून 2 ते 3 दिवसात ते 80 टक्केच्या वर जाणार असून सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के भरणार आहे. त्यानंतर पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. धरणाखाली असलेले दहा ते बारा बंधारे या मुसळधार पावसाने भरणार असल्याचे ही पंजाब डख यांनी सांगितले आहे.


पावसामुळं पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार


सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसामुळं सोयाबीन, मका, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तर जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा देशात आत्तापर्यंत 7 टक्के पाऊस अधिक झाला आहे. 


आज कसं असले महाराष्ट्रातील राज्यातील हवामान?


गेल्या काही दिवसापासून राज्यात चांगला पाऊस होत आहे. बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं अवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.  


हे ही वाचा