मुंबई : परतीच्या पावसानं महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह अनेक भागात होत असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रापासून कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात जाणारी वाहतूक बंद झाली आहे, तर शेकडो गावं संपर्काबाहेर गेली आहेत.
बीड, लातूरमधील सगळे लघुप्रकल्पही तुडुंब झाले आहेत. मांजरा धरणाचा जलसाठा 5 दशलक्ष घनमीटरवर पोहचला असून अद्यापही पाण्याची आवक सुरुच आहे. लातूर-बिदर रोडवरील सर्वात मोठा असणारा पूलही पाण्याखाली गेला आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या इशाऱ्यानं जनसामान्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मराठवाडा आणि मुंबईत अतिवृष्टीची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसत आहे.
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा :
मुंबईकरांनी पुढचे काही दिवस अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आयएमडीनं दिला आहे. शुक्रवारी रात्रभर मायानगरीत पावसानं धुमाकूळ घातला. ठाण्यासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस आहे.
दक्षिण मुंबईलाही अक्षरशः पावसानं झोडपून काढलं. हिंदमाता, परेलसह अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. सीएसटी परिरसात झाड कोसळल्यानं एक जण जखमी झाला, तर मुलुंडमध्येही भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी आहेत.
कोकण रेल्वेवर परिणाम :
गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला असताना आता या पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका बसलेला पहायला मिळत आहे. चिपळूण आणि खेड दरम्यान मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आल्याने कोकण रेल्वेवर परिणाम झाला आहे.
गोव्याकडे जाणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस खवटी स्थानकात थांबवण्यात आली होती. रात्री उशिरा ती मार्गस्थ झाली. आरवली बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आहे. त्यामुळे रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी, राज्यराणी, कोकणकन्या आणि मत्स्यगंधा या गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्या उशिराने रवाना झाल्या. आजही पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसण्याची शक्यता आहे.