मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यात मागील 4-5 दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वदूर पाऊस बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळालाआहे. ज्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातील नदी आणि नाले दुथडी भरुन वाहताना बघायला मिळाले. अशातच सध्या अधूनमधून पाऊस दिवसभरात काहीवेळ विश्रांती जरी घेत असला तरी महाराष्ट्रात पुढील तीन आठवडे पावसाचा चांगला अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस असेल, मात्र यात पावसाचा जोर कमी असेल. ह्या पावसामुळे पिकांना फायदा होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, कोकणात मात्र तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. 


20 ते 26 ऑगस्ट दरम्यानच्या पहिल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तिकडे मुंबईसह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कमी असण्याचा अंदाज आहे. दरम्यान असं असलं तरी कोकणात अनेक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो.  27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ज्यामध्ये मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. 


कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज


आज कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात देखील वाऱ्यांचा वेग आज अधिक असणार आहे, त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत. मुंबईत देखील सर्वत्र पावसाची रिपरिप बघायला मिळत असून मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. 


पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज


पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर इतरत्र पावसाची रिपरिप बघायला मिळणारआहे. ह्या तिन्ही जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट ठेवण्यात आला आहे. ज्यात काही ठिकाणी 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस बघायला मिळू शकतो. तिकडे मध्य महाराष्ट्रात देखील चांगला पाऊस बघायला मिळेल. ज्यात धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात देखील काहीठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर इतरत्र जिल्ह्यात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. 


मराठवाड्यातील  काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज


मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे तर  इतरत्र जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


 चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काही भागात मुसळधारेचा अंदाज


विदर्भात देखील चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काही भागात मुसळधारेचा अंदाज आहे तर विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, ह्या पावसामुळे शेतीला नवं जीवदान मिळणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.