पुणे : पुण्यामध्ये जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्यावर भर असेल, ज्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे त्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य देणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी सांगितलं. प्रत्येकाचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर मग बुस्टर डोसचा विचार करु असंही त्यांनी स्पष्ट केलं.  


पुण्यातल्या कोरोनाच्या स्थितीवर पालकमंत्री अजित पवारांनी आढाव बैठक घेतली. त्यानंतर बोलताना अजित पवार म्हणाले की, "पुण्यात सध्या कोरोना दर अडीच टक्के असून मत्यूदर 1.4 टक्के आहे. पुण्यातील लसीकरणाचा 70 लाखाचा टप्पा पार झाला असून गेल्या महिन्यात 16 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गेल्या चार आठवड्यामध्ये पुण्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन शहरात आणि जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन पुरवठा मुबलक होईल हे पाहिलं जात आहे." 


नवीन लोकांना पहिला डोस देण्यापूर्वी ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांना दुसरा डोस देऊन लसीकरण पूर्ण करायचं असं ठरवलं आहे. तसचे रुग्णालयाच्या बिलाबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार आहे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की, "आदर पुनावाला यांच्याशी बोलणं माझं बोलणं झालं नाही पण विभागीय आयुक्तांशी बोलणं झालं आहे. सीरमकडून पुण्यासाठी जास्तीत जास्त डोस उपलब्ध करण्यासंबंधी विचार करत आहोत. गरीब लोकांना, झोपडपट्टीवासियांना मोफत लस देण्याचा निर्णय झाला आहे."


एखाद्याने स्वत:च्या पैशाने बुस्टर डोस घेतला तर त्याला हरकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


इथून पुढे स्थानिक वृक्षांचे रोपण करा असेच आदेश वनविभागाला दिल्याचं अजित पवारानी सांगितलं. ते म्हणाले की, "फार पूर्वी एक चव्हाण नावाचे मंत्री होते, त्यांनी बाहेरचे काही वृक्ष आणले. यामध्ये सुबाभळ अशी काही झाडे आहेत. यामुळे पक्षी येत नाहीत, ते स्थानिक हवामानाला सूटही होत नाहीत. इतर काही झाडे आहेत ते अपायकारक असल्याने ती झाडे लावणं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."