Maharashtra Rain : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. अनेक भागात पाणीच पाणी झालं आहे. नदी नाले भरुन वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला काही भागांमध्ये शेती पिकांना फटका बसला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार आज कोकणमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई आणि नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भासह मराठवाड्यातही मुसळधा र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  जाणून घेऊयात राज्याच्या कोणकोणत्या भागात पाऊस झाला आहे. 

वाशिम जिल्ह्यात सलग 13व्या दिवशीही  मान्सूनपूर्व पाऊस

वाशिम जिल्ह्यात सलग 13व्या दिवशीही  मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे. जिल्ह्यात अनेक भागात कुठे जोरदार मध्यम तर कुठे हलका पाऊस बरसण्याचा सिलसिला 13 दिवसापासून सुरु आहे. अवेळी बरसणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मे महिन्याच्या शेवटीला ऊन तापत असते. त्यामुळें शेती मशागतीची कामे जोमाने शेतकरी पूर्ण  करत असतात. मात्र, सलग पाऊस पडत असल्याने शेती कामात मोठा खोळंबा निर्माण करत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. 

सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस

काल सकाळपासून सुरु झालेला पाऊस आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे. अखंडपणे पावसाची बॅटिंग सुरू आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला ,करमाळा, माढा ,माळशिरस या सर्व तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस जोरदार बरसत आहे. 

वादळी पावसानं पालघरच्या पूर्व भागाला झोडपलं

वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने पालघरच्या पूर्व भागाला झोडपलं आहे. वादळाच्या तडाख्याने निंबापूर येथे चिंचेच भलं मोठं झाड घरावर कोलमडलं आहे. दुर्घटनेत घराचं मोठं नुकसान झालं आहे. तर घरमालक विनोद भोये आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. घर उध्वस्त झाल्यानं भोये कुटुंब उघड्यावर आहे.  पंचनामा करून मदत देण्याची भोळे कुटुंबाने मागणी केली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळं ब्रम्हपुरी तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या बोडधा, मुडझा, हळदा आणि आवळगांव या गावातील धान पिक पुर्णतः नष्ट झाली आहेत. या भागातील उन्हाळी धानपिक कापून शेतात ठेवलेलं असताना जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने धानाच्या बांद्या पावसाने भरल्या आहेत. त्यामुळं शेतातील धानपिक पुर्णपणे खराब झालं आहे. ऐन तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हातचा गेला आहे.

बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिपझिप सुरु, खरीप पूर्व कामे खोळंबली 

बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिपझिप सुरु असून मध्यरात्रीपासून जिल्ह्याच्या विविध ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस सुरू आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप मशागतीचे कामे खोळंबली आहेत. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला आहे, तरी काढणीला आलेल्या नुकसान झाले आहेत. अवकाळी पावसामुळे धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.  

गडचिरोली दोन दिवसांपासून जोरदार पाऊस

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर परिसरातील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धान पिकाची लागवड केली होती. मात्र या पावसामुळे आता शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे. शेतीचे पंचनामे करू तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परभणीच्या गंगाखेड पूर्णा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

परभणीच्या गंगाखेड आणि पूर्णा शहरासह तालुक्यात आज दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावलीय. जोरदार वादळी वारे आणि पाऊस जवळपास एक तास झाल्याने गंगाखेड शहरामध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती. दरम्यान रात्रीपासून परभणी जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहेत सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दुपारी परत पावसाने हाजरी लावली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पावसामुळं धडगाव तालुक्यातील उदय नदीला पूर

नंदुरबार जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं धडगाव तालुक्यातील उदय नदीला पूर आला आहे. सावऱ्या दिगर येथील उदय नदीवरील पुलाचे काम रखडले आहे. नदीला पाणी आल्याने मोटर सायकल उचलून नदीपार केली. नागरिकांना धोकेदायक प्रवास करावा लागत आहे. 

राज्यातल्या 85 तालुक्यांना पावसाचा फटका

राज्यात मे महिन्यातील झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठा नुकसान झालं आहे. राज्यातल्या जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 22 हजार 233 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झालं आहे. मका, ज्वारी, भाजीपाला, संत्रा, भात, आंबा, फळपिके या पिकांच अवकाळी पावसामुळं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा अमरावती,जळगाव,नाशिक,चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांना बसला आहे.

महत्वाच्या बातम्या:

मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल, पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रात धडकणार, हवामान विभागाची माहिती