Maharashtra Rain Update : राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: भंडारा आणि गोंदियात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, आज काहीसा पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात पावसानं विश्रांती घेतलं असल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान, आज पाऊस असल्याने कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट असणार? जाणून घ्या


भंडारा जिल्ह्यात पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले, शेतकऱ्यांवर पुन्हा संकट?


भंडारा जिल्ह्यात काल सकाळपासून कुठे संततधार तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पाऊस असल्याने जिल्हातील नदी-नाले पुन्हा तुंडुंब भरुन वाहत लागले आहे. दरम्यान शेतकऱ्यांवर पुन्हा संकट तर येणार नाही? अशी चिंता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भंडारा जिल्हाला हवामान खात्याच्या यलो अलर्ट मिळाला आहे. त्याच्या परिणाम स्वरूप वैनगंगा नदी इशारा पातळीवर पोहचली असून वैनगंगा नदीला नियंत्रित करण्याकरिता गोसीखुर्द धरणाचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावाला धोकादायक इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आले आहे. विशेष म्हणजे संभाव्य पुर परिस्थिति लक्षात घेता जनतेसाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी एक संदेश ही जारी करत सुरक्षित राहाण्याचे आवाहन केले आहे.



गडचिरोलीत आलापल्ली-भामरागड मार्ग पुन्हा एकदा बंद
गडचिरोली छत्तीसगड राज्यात मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे, आलापल्ली- भामरागड मार्ग पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे, चार दिवस हा मार्ग बंद होता. 12 तारखेला हा मार्ग वाहतुकासाठी मोकळा झाला होता, मात्र छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पार्लकोट नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुलावरून पाणी जात असल्याने हा मार्ग वाहतुकासाठी बंद झाला आहे



गोंदियाला पुन्हा रेड अलर्ट, 36 तासापासुन मुसळधार पाऊस सुरु
गोंदिया जिल्हाला हवामान खात्याचा पुन्हा रेड अलर्ट मिळाला असून 36 तासापासुन कुठे मुसळधार तर कुठे संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण जलाशये 100 टक्के भरले गेले असून ओवरफ्लो होउ लागले आहे. विशेष म्हणजे येत असलेल्या पावसामुळे अनेक मार्गावर  पाणी असून काही रस्त्ये ही बंद झाले आहे. दुसरीकडे आमगाव तालुक्यातील नदी काठच्या गावातील लोकांचे स्थानांतरण सुरू करण्यात आले आहे. सध्या आमगाव नगर परीषद क्षेत्रातील बंनगाव येथील 40 लोकांचे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्थानांतरण करण्यात आले आहे. बागनदी काठच्या मोहन टोला, महारी टोला येथील नागरिकांना हलविण्याचे प्रशासन प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या स्वातंत्र्या दिनाच्या कार्यक्रमावर विरजण पडणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. 


नंदुरबार जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग 


नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाची विश्रांती पाहायला मिळतेय,  मात्र रात्री पासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक नदी-नाले धरण वाहू लागले आहेत.


वर्ध्यात पावसाची संततधार सुरू
वर्धा जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. मात्र पूर परिस्थिती नाही, नागरिक सुरक्षित आहेत, रस्तेही सुरळीत आहेत.