Maharashtra Rain Update LIVE : आज कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update LIVE : भारतीय हवामान विभागानुसार (IMD) येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Sep 2022 05:02 PM
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता : हवामान विभाग
Maharashtra Rains Forecast : तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सकाळी 8.30 वाजता कमकुवत झाले असले तरी महाराष्ट्रावर प्रभाव कायम 

 

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता 

 

विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधारेचा अंदाज 

 

मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता तर कोकणात पुढील पाच दिवस पावसाचं धुमशान 

 

वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने समुद्र खवळलेला आहे, अशात मच्छिमारांना पुढील दोन दिवस अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा
Maharashtra : येलदरी धरणाचे 2 दरवाजे उघडले

Maharashtra : मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेल्या परभणीच्या येलदरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत या दोन दरवाजांमधून 4424 तर विद्युत प्रकल्पातुन 1800 क्युसेक्स असा एकुण 6224 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.महत्वाचे म्हणजे 2013 ते 19 सलग 6 वर्ष धरण भरले नाही परंतु 2019 ते 2022 सलग 4 वर्ष धरणं 100 टक्के  भरून पाणी सोडण्याचा यंदा विक्रम झाला आहे. धरण बांधल्यापासून आजतागायत पहिल्यांदाच सलग 4 वर्ष येलदरी भरले आहे. यंदा ही धरण भरल्याने परभणी,हिंगोली, नांदेड, वसमत,पुर्णा या 5 प्रमुख शहरासह 200 खेड्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे तसेच जवळपास 60 हजार हेक्टर वरील शेतीपिकांना यांचा फायदा होणार आहे.

Bhandara : सलगच्या पावसाने जिल्ह्यातील 5 मार्ग बंद; भंडाऱ्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट 

Bhandara : आज सकाळ पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून सलगच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचले गेले आहे त्याचा परिणाम स्वरूप जिल्ह्यातील 5 गाव मार्ग बंद झाले आहे।विशेष म्हणजे भंडाऱ्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट मिळाला आहे।सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील पाच गाव मार्ग बंद झाले असून त्यात पाऊलदवणा ते बेला; लाखांदूर ते पिंपळगाव कोहळी; अड्याळ ते विरली;विरले ते सोनेगाव;सोनमाला ते कोढ़ा मार्ग बंद झालेले आहे. मात्र या गावांना जोडणारे इतर पर्यायी मार्ग सुरू असल्याने सध्या गावाचा संपर्क तुटला नाही. तर दुसरीकडे गोसेखुर धरणाचे 33 पैकी 11 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून 1379 क्यूमॅक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विशेष सलग दोन दिवस ऑरेंज अलर्ट मिळाल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान मागील महिन्यात दोनदा या अतिवृष्टिने पूर आल्याने येणारा पाऊस मागच्या पुराची आठवण करून देणारा ठरत असून जिल्हावासीय येणाऱ्या पावसाच्या दहशतीत आहे.

Nagpur Police : सोनेगाव पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा, वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर झरा

Nagpur Police : फक्त सव्वा तास झालेल्या दमदार पावसाने नागपूरच्या रस्त्यांनाच नदीचे स्वरूप दिले नाही. तर अनेक कार्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. कार्यालयांच्या आत तलावसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. सोनेगाव पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले असून वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर तर अक्षरशः झरा वाहतोय. अशा स्वरूपात पाणी वाहत आहे.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस, माहूरचा फरीदबाबा धबधबा खळखळून वाहतोय.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यातील माहुर तालुका म्हटलं की, पावसाळ्यात हिरवागार निसर्गरम्य परिसर आहे. आई रेणुका मातेचे मंदिर, गोंड राजांनी बांधलेली रामगड किल्ला परिसर, प्रभू दत्तात्रयाचे निद्रास्थान परिसर, घनदाट हिरवेगार जंगल असे चित्र डोळ्या समोर येते. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत असून माहूर येथील फरीदबाबा धबधबा खळखळून वाहतोय. दरम्यान फेसाळत वाहणाऱ्या धबधब्याचे हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. दरम्यान हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचाही ओघ या पर्यटन स्थळांकडे वाढला आहे.

Vidarbha Rain : विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग, नदीकाठच्या वस्त्यांना सावधगिरीचा इशारा

Vidarbha Rain : विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. रात्री कोसळलेल्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावांचा संपर्क जिल्हा तालुका मुख्यालय तुटला होता. मात्र त्यानंतर पाऊस थांबल्यामुळे वाहतूक पूर्वपदावर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे 60 सेंटिमीटरने उघडावे लागले आहेत. तर वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरणातील 31 दरवाजे 60 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या वस्त्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

Nagpur Rain : नागपुरात पावसाचे जोरदार कमबॅक; कार्यालय, शाळा आणि महाविद्यालयाला जाताना लोकांची तारांबळ

Nagpur Rain : नागपुरात पावसाने आज सकाळपासून जोरदार कमबॅक केले आहे. सकाळी एक तास झालेल्या मध्यम स्वरूपाचे पावसानंतर पाऊने दहा वाजताच्या सुमारास पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. सकाळी एक तास पाऊस कोसळल्यानंतर काही वेळ थांबला होता. मात्र, नेमकं लोकांच्या कार्यालय आणि शाळा, महाविद्यालयाला जायच्या वेळेला पाऊस आल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही होत असून वाहनं थांबून चालत आहेत. ज्या ठिकाणी सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे, त्या भागात तसेच सखल भागात पाणी साचायलाही सुरुवात झाली आहे. पंचदीप नगर, मेडिकल कॉलेज चौक, नरेंद्र नगर अंडरपास, शंकर नगर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी वाहत असल्याचे दिसून आले. सकाळची उघडीप पाहून रेनकोट आणि छत्री शिवाय बाहेर पडलेल्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाने आधीच नागपूरसाठी तीन दिवस येलो अॅलर्टचा इशारा दिला आहे.


 


 

Yavatmal Rain : बेंबळा प्रकल्पाचे सर्व 20 दरवाजे उघडले; पाच तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Yavatmal Rain : जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान झाल्यामुळे. प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे. जलाशय पातळी नियंत्रणात  ठेवण्याकरीता 20 दरवाजे उघडण्यात आले आहे. या दरवाज्यातून 2000 कुसिक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे बेंबळा नदी काठावरील बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी या पाच तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला आहे. नदी नाल्यावरून पाणी असताना कोणीही यावरून जाऊ नये. असा समंधीत ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना प्रत्येक तहसील कार्यालयाला जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

Amravati Rain : चांदूर रेल्वे तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी; नद्यांना पूर, प्रशासन अलर्ट

Amravati Rain : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात रविवार पासून सतत मुसळधार पावसाने हजेरी लावली असुन अनेक नद्यांना पुर आला आहे. प्रशासन अलर्टवर असून तहसिलदार राजेंद्र इंगळे यांनी आज सकाळीच पुरग्रस्त गावांना भेट दिली असून अजूनही भर पावसात सुध्दा ते दौऱ्यावरच आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा, जवळा धोत्रा गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. तसेच राजुरा वरून चांदूर रेल्वे कडे येण्याचे दोन्ही रस्ते बंद आहे अशी माहिती मिळाली. तसेच कळमगाव येथील पुलावरून सुध्दा मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. पाणि वाहतांना पुल ओलांडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Yavatmal Rain : अडाण नदीला पूर, यवतमाळ ते दारव्हा मार्ग बंद

Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून जोरदार पाऊस झाला. अडान धरणंक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाण्यात वाढ झाल्याने अडान प्रकल्पाचे 5 दरवाजे 70 सेंटीमीटने उघडून 403.72 कुमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या पावसामुळे बोरीअरब येथून वाहणाऱ्या अडाण नदीला पूर आला. त्यामुळे बोरी अरब जवळच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे यवतमाळ ते दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या ठिकाणी बॅरकेट्स लावण्यात आले आहे. 

Wardha Rain : हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला पुराचा वेढा, नागरिकांच्या मनात धास्ती 

Wardha Rain : वर्धा जील्हातील हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या जुनी कान्होली या गावाला नदीच्या पुराच्या पाण्याने वेढले आहे. कालपासून वर्धा जिल्ह्यात सततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे छोटे नदी,नाले आणि धरणांच्या पाण्यात देखील वाढ झाली आहे.. पुराचे पाणी हे दोन ते तीन फुट कान्होली च्या रस्त्यांवर आल्यामुळे गावाला पुराचा वेढा बसला आहे नागरिक मात्र सुरक्षित आहेत आणि नित्याच्या कामासाठी काही नागरिक पुराच्या दोन ते तीन फूट पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. पावसाचा जोर जर कायम राहिला तर नागरिकांना पुन्हा पूर परिस्थितीला समोर जावं लागेल अशी धास्ती कान्होलीच्या नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

Nanded Rain : कंधारचा ऐतिहासिक जगतुंग तलाव चाळीस वर्षांनंतर ओव्हरफ्लो, घरांसह शेती पिके पाण्याखाली जाण्याची भीती

Nanded Rain : तब्बल 25 दिवसाच्या उघडीपी नंतर नांदेड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्या दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प 100 क्षमतेने भरले आहेत. तर ऐतिहासिक वैभव लाभलेला कंधार येथील जगतुंग तलाव तब्बल 40 वर्षांनंतर ओव्हरफ्लो झालाय. जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना असणारा ऐतिहासिक जगतुंग समुद्र म्हणून ओळखला जाणारा कंधार येथील तलाव तुडुंब भरला असून कामदेव मंदिरही पाण्याखाली  गेले आहे. दरम्यान गेल्या चाळीस वर्षा पासून हा तलाव ओव्हरफ्लो झाला नव्हता, पण गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे, या तलावाच्या सांडव्यातून तब्बल चार दशकानंतर सुमारे अर्धा फुटाने विसर्ग सुरू आहे. दरम्यान या तलावातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास तलावाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या कोटबाजार, मानसपुरी, बहाद्दरपुरा गावे पाण्याखाली जाऊन शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे जगतुंग मधील पाण्याचा विसर्ग अधिक झाल्यास घरांसह शेती पिके पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झालीय.

Vidarbha Rain : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मध्यरात्री पासून पाऊस सुरू, सखोल भागात साचले पाणी 

Vidarbha Rain : भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात झाली असून अनेक सखोल भागात आज सकाळ पासून पाणी साचले आहे. गेले काही दिवस पावसाने उसंत दिली होती, शिवाय सतत ऊन तापत असल्यामुळे उन्हाचा तडाखाही नागरिकाना जाणवू लागला होता. मात्र रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे तर दुसरीकडे शेतीपिकाला देखील या पाऊसाचा फायदा झाला आहे 

Sindhudurg Rain : तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संतातधार सुरू आहे. जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. काल संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. जिल्ह्यात नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तिलारी धरणातून तिलारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Beed Rain : मांजरा धरणात पाण्याची मोठी आवक सुरू, बीडसह तीन जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली

Beed Rain : पावसानं मोठी उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्याने मांजरा धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे मांजरा धरणामध्ये 44.29% पाणीसाठा झाला असून यामुळे बीड सह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. तीन महिन्याच्या काळामध्ये एकही मोठा पाऊस झाला नव्हता, मात्र तब्बल एक महिनाभर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या तलावात अपेक्षित पाणीसाठा झाला नव्हता. मात्र आता गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आला असून हे पाणी मांजरा धरणात आल्याने बीडसह तीन जिल्ह्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे.

Nagpur Rain : नागपुरात पुन्हा पावसाचा जोर वाढला, तीन दिवस येलो अलर्टचा इशारा

Nagpur Rain : नागपुरात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. सकाळी एक तास पाऊस कोसळल्यानंतर काही वेळ थांबला होता.मात्र दहा वाजता पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. नेमकं लोकांच्या कार्यालय आणि शाळा महाविद्यालयाला जाण्याच्या वेळेला पाऊस आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून वाहन थांबून थांबून चालत आहेत. ज्या ठिकाणी सिमेंट रस्त्यांचे काम सुरू असलेल्या भागात तसेच सखल भागात पाणी साचायलाही सुरुवात झाली आहे. तर सकाळची उघडीप पाहून रेनकोट आणि छत्री शिवाय बाहेर पडलेल्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाने आधीच नागपूरसाठी तीन दिवस येलो अलर्टचा इशारा दिला आहे..

Amravati Rain : अमरावती शहरासह अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

Amravati Rain : अमरावती शहरासह अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. काल दुपारपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. अप्पर वर्धा धरणाचे पूर्ण 13 दरवाजे 60 CM ने उघडण्यात आले असून विदर्भात 5 दिवस मुसळधार पावसाचा दिलाय अंदाज.

Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु, आर्वी वर्धमनेरी मार्ग बंद

Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व 31 दरवाजे 60 सेमीने उघडले. पुलावर पाणी आल्याने आर्वी वर्धमनेरी मार्ग बंद आहे. कालपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पात येवा वाढल्याने आज 12 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता धरणाचे 9 दरवाजे 25 सेमीने उघडण्यात येणार आहे. प्रकल्पातून 163 घन.मी/से विसर्ग बोर नदी पात्रात सोडला जाणार असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.


निम्न वर्धाचे 31 दरवाजे 60 सेमीने उघडले


निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पर्जन्यमान होत असल्याने आणि प्रकल्पात येवा वाढल्याने प्रकल्पाचे सर्व 31 दरवाजे 60 सेंमीने उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून 1687 घन.मी/सें इतका विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडला जात आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी पुलावरुन पाणी वाहत असल्याने दोनही मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

Pune Rain : पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस, जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली

Pune Rain : पुणे जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार खडकवासला धरण 99.77 टक्के भरले. तर खडकवासला धरणात 29.08 टीएमसी इतकं पाणी भरलं यामुळे, पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 13 धरणे 100 टक्के भरली

गडचिरोलीत मुसळधार पाऊस, पर्लकोटा नदीला पूर आल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे भामरागड शहराला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आला असून पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. परिणामी आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाले आहेत.

दुष्काळी करमाळ्यातील वीट गावात तलाव ओव्हरफ्लो, धबधब्यात भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Solapur Rains : दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या करमाळा तालुक्यातील काही भागात यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजाची खुशीत आहे. करमाळा तालुक्यातील वीट या गावातील अंजनडोह तलाव सततच्या पावसाने ओव्हरफ्लो झाल्याने ठिकठिकाणी धबधबे प्रवाहित झाले आहे. या धबधब्यात भिजण्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले आता या वीट गावाकडे वाळू लागली आहेत. सध्या अंजनडोह तलावाच्या दोन बाजूने हे मोठे धबधबे सुरु झाल्याने इथे फोटोसेशन करण्यासाठी पर्यटक गर्दी करु लागले आहेत.



Ambernath Rain : अंबरनाथमध्ये एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली, 2 जण गंभीर जखमी

Ambernath Rain :  अंबरनाथमध्ये काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जमीन खचून एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली. या घटनेत घरातील 3 जण जखमी झाले असून यापैकी दोघांना गंभीर स्वरूपाची इजा झालीये. आंबेडकर नगर परिसरात सकाळी 6 वाजता दुर्घटना घडली.

Sangli Rain : चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी

Sangli Rain : चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. तर वाळवा, शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. 

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, पावसाच्या जोरदार सरी

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. 

Nanded Rain : माहुर तालुक्यातील वाई बाजार परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

Nanded Rain : माहुर तालुक्यातील वाई बाजार परिसरात आज सकाळी 3 वाजल्या पासून पाऊस सुरु झाला असून अद्यापही पावसाचा जोर सुरू आहे. या भयंकर पावसाने रौद्ररूप धारण केले असून हरडफ गांवकाठच्या नाल्याला भयंकर पूर आल्याने नागरीवस्तीतही पावसाचे पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांची तांराबळ उडालीय. तर या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतशिवाराचे प्रचंड नुकसान झाले आहे.

नांदेडच्या वाई बाजार परिसरात ढगफुटीसदृश पाऊस, ओढे-नाले ओव्हरफ्लो, गावात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ

Nanded News : नांदेड जिल्ह्याच्या माहुर तालुक्यातील वाई बाजार परिसरात आज पहाटे तीन वाजल्यापासून पाऊस सुरु झाला असून अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. या भयंकर पावसाने रौद्ररुप धारण केले असून हरडफ गांवकाठच्या नाल्याला पूर आल्याने नागरी वस्तीतही पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतशिवाराचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Parbhani Rain : परभणीत काल रात्रीपासून संततधार पाऊस, नदीनाल्यांमध्ये पाणी भरले

Parbhani Rain : परभणीत काल रात्रीपासून संततधार पाऊस पडत असून नदीनाल्यांमध्ये पाणी भरले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकल्प ही ओव्हरफ्लो झालेली पाहायला मिळत आहे. 

Washin Rain : वाशिम जिल्ह्यात कालपासून बरसतोय मुसळधार पाऊस, पिकांना मोठा फायदा मिळणार


Washin Rain : वाशिम जिल्ह्यात कालपासून जोरदार मुसळधार पाऊस बरसतोय, गेल्या काही दिवसा पासून भर पावसाळ्यात पाऊस नसल्याने चांगलाच उकाडा वाढला होता. तर अनेक भागात पीक ही माना टाकायला सुरवात केली होती. मात्र ऐन सोयाबीन च्या शेंगा भरणीच्या वेळेस पाऊस बरसल्याने पिकांना मोठा फायदा मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे

Buldhana Rain : जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, काही भागात अतिवृष्टी

Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी पाच वाजेपासून मुसळधार पाऊस बरसत आहे काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस आज सकाळीही संततधार सुरूच आहे जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याचेही माहिती मिळाली आहे सर्व नदी ओढ्यांना पूर आलेला असून काही भागात हा पाऊस शेतकऱ्यांसाठी चांगला समजला जातोय तर काही भागात पिकांचे नुकसानही संभवत आहे तूर कापूस या पिकांसाठी हा पाऊस चांगला मानला जात आहे तर आता हातात तोंडाची आलेलं सोयाबीन पीक मात्र काही भागात सडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतकरी हे चिंता दूर आहेत जिल्ह्यात सरासरी 65 ते 75 मिलिमीटर पाऊस झाला असून या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये काही खुशी कही गम असे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यांची पातळी ही वाढली असून पूर्णा नदीलाही मोठा पूर आलेला आहे. जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात झालेल्या पावसामुळे ओढायला आलेल्या पुरात एक इसम वाहून जाताना त्याला नागरिकांनी वाचवलं आहे देऊळगाव राजा तालुक्यात जवळपास सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे जिल्ह्यातील शेगाव खामगाव नांदुरा जळगाव जामोद संग्रामपूर आणि मलकापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालेला आहे

पार्श्वभूमी

Maharashtra Rain : मागील काही दिवसांमध्ये मुंबई(Mumbai) , कोकणासह (Konkan) राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा पाहायला मिळाला, मात्र भारतीय हवामान विभागानुसार (IMD) येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय. दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाडा भागात आज 12 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज 12 आणि उद्या 13 सप्टेंबर हे तीन दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाने केलंय.पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता राज्यातील मच्छिमारांना पुढचे काही दिवस मासेमारीसाठी अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.