Maharashtra Monsoon Update : राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून मागील तीन दिवस राज्यभरात पावसाची रिपरिप (Rain Update) पाहायला मिळाली. राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज 'स्कायमेट' संस्थेने वर्तवला आहे. स्कायमेट ही (Skymet Weather) हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था आहे. 'स्कायमेट' संस्थेच्या अंदाजानुसार, राज्यात आजही पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे. येत्या 24 तासांत राज्यात काही ठिकाणी तुरळक ते मध्यम पावसाच्या (Light to Moderate Rain) सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात येत आहे.


देशभरात तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता


देशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 'स्कायमेट' संस्थेच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत विदर्भ, मराठवाडा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पूर्व गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि अरुणाचलमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.  याशिवाय तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि ईशान्य भारताच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि पंजाबमध्येही हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.






पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांचं नुकसान


गेले काही दिवस राज्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसानं झोडपल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी पावसाची संततधार पाहायला मिळाली. यामुळे उभ्या पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर रविवारीही कायम होता. नांदेड जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंत 1100 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. हिंगोली शहरासह वसमत औंढा नागनाथ तालुक्यात पावसानं हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस, हळद, ज्वारीसह मिरची या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.