Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात आठवड्याची सुरुवात पावसाने झाली आहे. कोकणासह मराठवाड्यात जोरदार पावसानं सोमवारपासूनच हजेरी लावली आहे. ठाणे, मुंबईसह उपनगरात मंगळवारी पहाटेपासूनच पावसानं हजेरी लावली आहे. तर मंगळवारीही रत्नागिरीत चिपळूण, दापोलीत पावसानं दमदार हजेरी लावली. तर दुसरीकडे मराठवाड्यात औरंगाबाद, बीड भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बीडमध्ये जोरदार पावासमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं हजेरी लावली आहे.


'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात मुंबई, पुणे, मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. हवामान खात्याकडून राज्यात आगामी पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार, पुढील तीन ते चार दिवस कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून कोकणासह घाट परिसर असलेल्या भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस


अकोला जिल्ह्यात रात्री सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या पुलावर पाणी आल्यानं लोणाग्रा-आगर रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या छोट्या पुलावरील भराव वाहून गेला. बाळापूर तालूक्यातील मांजरी गावात पुराचं पाणी अनेक घरांत घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.






 


औरंगाबादमध्ये जोरदार पाऊस


औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. दुपारनंतर जिल्ह्यातील वाळूज,बिडकीन,चितेगाव,करमाड,बाजारसावंगी,सिल्लोड,अजिंठा यासह अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात अजूनही पाऊस सुरूच आहे. तर सिल्लोड येथील बनकिन्होळा गावाची नदी भरून वाहत आहे.


कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज



पुढील 3 ते 4 तास रत्नागिरीसह सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. रायगड जिल्ह्याला देखील या पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह ठाण्यात अंशतः ढगाळ आकाश आहे. मुंबईत काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरु आहे. घाट भागातही पावसाच्या काही तीव्र सरींसाठी अनुकूल वातावरण दिसत  असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.



महत्त्वाच्या इतर बातम्या