Maharashtra Rain Update : ऐन हिवाळ्यात राज्यभरातील पावसानं हजेरी लावल्यानं वातावरण बदलांचा सामना करावा लागत आहे. मुंबईसह उपनगरांत (Heavy rains in Mumbai) आणि पुण्यात काल संध्याकाळपासूनच पावसानं हजेरी लावली होती. मुंबईसह उपनगरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. सोबतच ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतही पावसाची कोसळधार पाहायला मिळाली. 


मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. दादर, माहीम, वरळी आणि दक्षिण मुंबईत संथ गतीने पाऊस पडतोय. पूर्व मध्य आणि पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पुढच्या 2 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.


अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं कोकणासह, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पुढील 3 तास पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबादमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच यादरम्यान वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहणाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 24 तास समुद्रात न जाण्याचा इशारा मच्छिमारांना हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग 60 किमी प्रति तासापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहनंही हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. ऐन हिवाळ्यात पडलेल्या पावसानं रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. काही भागांत तर हाता तोंडाशी आलेलं पिक पावसामुळं वाहून गेलं आहे. तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या बळीराज्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; चौघांचा मृत्यू , सहा जखमी, दोघांची प्रकृती गंभीर!