Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. काही भागांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे, तर काही भागांत पावसानं विश्रांती घेतली आहे. मुंबईतही सोमवारपासून पावसाची रिपरिप सुरु आहे.  गोंदिया शहरातील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. नंदुरबार, वर्धा जिल्ह्यातहा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे.


मुंबईत पावसाची रिपरिप


मुंबईत मध्र्यरात्रीपासून रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मुंबईत काही भागात अधूनमधून रिमझिम पाऊस सुरु असल्यानं वातावरण थंड आहे. मंगळवारी सकाळीही काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे. मुंबईत रस्ते वाहतुक सुरळीत सुरू आहे. तसेच तिन्ही मार्गावरच्या रेल्वे देखील सुरळीत सुरू आहेत.


गोंदियामध्ये नागरिकांच्या घरांत शिरलं पाणी


गोंदिया शहरातील मुख्य चौकांना मुसळधारेमुळे तळ्याचे स्वरूप आलं आहे. बांध, तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरल आहे. चौरागडे चौकासह अनेक रस्त्यांवर दोन फुट पाणी साचलं आहे. गोंदिया-बालाघाट मार्ग आणि गोंदिया-नागपूर मार्गावर नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गोंदिया जिल्यात मागील 36 तासा पासून सुरु असेलल्या मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं गोंदिया शहर जलमय झालं आहे. गोंदिया शहरातील सखल भागात तलावाचं स्वरूप निर्माण झालं आहे. शहरातील अनेक मुख्य चौकासह रस्त्यांवर दोन फुट पाणी साचल्याने अनेक लोकांना सह लहान मुलांना देखील आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे


गडचिरोतील अनेक भागात पूरस्थिती


भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला असून अनेक गावांचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. दरम्यान नदीनाल्याना पूर आल्याने पुराचे पाणी शेतजमिनीत घुसले असून शेकडो हेक्टर धान शेती पाण्याखाली आली आहे.  तर लाखांदूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातून वाहणारी चुलबंद नदीला पूर आला. तालुक्यातील लहान मोठे नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. चुलाबंद नदीला आलेल्या पुरामुळे बारव्हा ते तई रस्ता, धर्मापुरी ते बारव्हा, बोथली - तई, दांडेगाव - कोच्ची, धर्मापुरी - बारव्हा, भागडी - मांढळ, तई - परसोडी, लाखांदूर - सोनी, आसोला - आथली असे अनेक मार्ग बंद पडले आहेत. दरम्यान तालुक्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेऊन आहेत.


पूरजन्य परिस्थितीमुळे शेतकरी पुन्हा संकटात


मुसळधार पाऊस आणि गोसीखुर्द धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोतील अनेक भागात पूरस्थिती पाहायला मिळत आहे. पुरामुळे ग्रामीण भागातील अनेक मुख्य मार्ग बंद झाले असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चुलबंद नदीला पूर आल्याने लाखांदूर - वडासा वाहतूक मार्ग ठप्प झाला आहे. शेकडो एकर शेतजमीन पुराचा पाण्याखाली आल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.


भंडारा जिल्ह्यात पूरस्थितीमुळे नागरिकांचं स्थलांतर


भंडारा जिल्हाची जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा नदीने धोक्याची पातळी तीन मीटरने वाढली आहे. भंडारा शहराला पुराचा वेढा घातला आहे. यात विशेष म्हणजे भंडारा शहरालगत असलेल्या टाकली. खमाटा येथे पुराचे पाणी अडीच फुटावर आल्याने भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनी, टप्पा मोहल्ला, खमाटा, कपिल नगर, गणेश नगरी या शहरालगतच्या भागात पुराचे पाणी येत असल्याने जिल्हा प्राशसनाने खबरदारी म्हणून येथील लोकांचं स्थलांतर केलं आहे. तर जिल्ह्यात भंडारा, तुमसर,मोहाडी तालुक्यात पुराचा फटका बसल्याने येथील तब्बल 150 च्या कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.