मुंबई : ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसलाय. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.  तर, कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला या पावसानं धडकीच भरलीए. सातारा शहर आणि महाबळेश्वरमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे स्ट्रॉबेरीचं पीक धोक्यात आलं. तिकडे कोकणातील रत्नागिरीतल्या चिपळूण, गुहागर, खेड, दापोलीतही सरी बरसल्यात. त्यामुळे आंबा पीक संकटात सापडलंय. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय.


सातारा : 


महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरी पिकावर मोठ्या प्रमाणात झाल्याच चित्र दिसू लागले आहे. स्ट्रॉबेरी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यामुळे येणा-या काळातील स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणात घटणार असे चित्र दिसत आहे. गेल्या महिन्यात जो काही अवकाळी पाऊस झाला त्याने नुकसान केलेच शिवाय रोगाचा प्रादुर्भावही वाढला. शेतकरी मेटाकुटीला आला आणि शेतक-याने फवारणी करुन पिक सुधरवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती सुधारेल असे कुठे वाटत असताना पुन्हा झालेल्या या पाऊसामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला.


सिंधुदुर्ग :


कोकणात कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळं आंब्याच्या झाडांना आलेला मोहोर गळून गेलाय. याबाबत आंबा उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे.  त्यामुळे त्यामधून मिळणाऱ्‍या उत्पन्नाला बागायतदारांना मुकावे लागले आहे. त्या झाडांना पुन्हा जानेवारी महिन्यात मोहोर येईल. सध्या थंडीलाही विलंब झाला. तसेच किमान तापमान मोहोर फुटीला आवश्यक एवढे नाही. त्यामुळे वातावरणातील बदलांचा आंबा हंगामावर परिणाम झाला आहे. आंबा हंगाम हा सर्वसाधारण 100 ते 110 दिवसांचा असतो. मात्र यंदा बदलत्या वातावरणाचा परिणाम झाल्यामुळे 60 ते 70 दिवसांचा हंगाम राहण्याची शक्यता आहे.


30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावआणि औरंगाबादमध्ये काही ठिकाणी 1 आणि 2 डिसेंबर रोजी सरी कोसळतील. अशात शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो. 


कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस 


कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यातआला आहे. ज्यात मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबादसारख्या जिल्ह्यांनादेखील 1 आणि 2 डिसेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ह्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.


Maharashtra Rain Update : अरेच्चा, हा तर हिवसाळा!