Maharashtra Rain : राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) झाला असून अनेक भागात पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून वातावरणात बदल होत आहे. काही भागात उन्हाचा चटका अद्यापही जाणवत आहे. मात्र, काही भागातपावसाचा जोर असल्याचं पाहायाल मिळत आहे. दरम्यान, या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत होते. तर पारनेर तालुक्यातील सुपा येथे दुपारच्या टप्प्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसामुळे सकल भागात पाणी साचलं होते. या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे.
यवतमाळमध्ये जोरदार पाऊस
यवतमाळ जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे. आज दुपारी विजेच्या कडकडाटासह जोरदार वळवाचा पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या पावसामुळे नागरिकांना काहीसा उकड्यापासून सुटका झाली.
धुळ्यातील साक्री तालुक्यातील अवकाळीचे पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत
साक्री तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा विविध ठिकाणी फटका बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून नुकसान झाले आहे. एका वयोवृद्ध महिलेच्या घराची पडझड झाल्याने तिची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मोहने गुंजाळ येथील सुरीबाई साधू अहिरे या शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या. दरम्यान, जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने त्यांच्या गरीब घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच, मोहने ग्रामपंचायतीचे सरपंच जितू गावित यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील हिंगोली सेनगाव कळमनुरी या तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये या पावसाने हजेरी लावली असून माळशेलू माळहिवरा या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या भागामध्ये तब्बल एक तास अवकाळी पाऊस धो धो बरसत होता. या पावसामुळं उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला आहे.
वाशिममध्ये वळवाच्या पावसाचं लग्नात विघ्न
वाशिमच्या विविध भागात आज वळीवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने शेतकऱ्यांची शेतमाल विक्रीसाठी नेले असता पावसापासून वाचवण्यात दाणादाण उडाली. तर लग्नाची तिथी दाट असल्याने अनेक लग्न मंडपात चिखल झाल्याने पाहुणे मंडळींना गावातील ओट्या वरांडयाचा पावसापासून बचावासाठी आधार घ्यावा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
अमरावतीत मुसळधार पाऊस
अमरावती शहरासह अनेक तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झालीय. या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांचा उन्हाचा उकाडा कमी झाला आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडालीय. अमरावती शहरात दमदार पाऊस झाल्याने गारवा निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या: