Maharashtra Rain : हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली आहे. कारण काही ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. रब्बी पिकांचं तसेच फळबागांचं नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पाहुयात कुठे कुठे पाऊस झाला....
नांदेड : वादळी वाऱ्यासह गारपीट, एकाचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड तालुक्यात सायंकाळी जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बारड येथे घर कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव, चनापूर, पाटणूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. केळीच्या बागांना मोठा फटाका बसला. वीजवितरण कंपनीचे विद्युत खांब, तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. हरभरा, गहू आंबा आदी पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मुदखेड तालुक्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नांदेड-मुदखेड मार्गावर काही ठिकाणी झाडे पडली आहेत. हदगाव तालुक्यालाही वादळी पावसाचा तडाखा बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ, सदलापूर, बादोला, सापळा, किनिमोड या भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडी यासारख्या काढणीला आलेल्या पिकांना यामुळे फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाने झोडपून काढल्यामुळे आंब्याच्या फळबागेला नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
अहमदनगर
अहमदनगर शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू, कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा येथील सांगवी दुमला गावात नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली.
रायगड
रायगड जिल्ह्यातील नावंढे, देवन्हावे गाव आणि परिसर, डोलवली, घोडीवली, कोलाड, रोहा, कर्जत पेणमध्ये अवकाळी पाऊस पडला.
बारामती तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
बारामती तालुक्यातील बहुसंख्य ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बारामतीसाह इंदापूर, दौंड तालुक्यात काही ठिकाणी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढण्यास आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस
हवामान विभागाने वर्तवलेला अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाल्यानं शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. गहू, ज्वारी, हरभरा यासह संत्रा, मोसंबी आणि आंब्यांच्या बागांचे या पावसामुळे नुकसान होणार आहे.
जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूरसह मंठा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा पिकांसह मोसंबी , द्राक्ष आणि आंब्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.
मुंबईसह ठाण्यातही पाऊस
मुंबईमध्येही विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तसेस ठाणे जिल्ह्यातहीअवकाळी पावसाने लावली हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Mumbai Rain : मुंबईसह ठाण्यात 'अवकाळीच्या सरी', उकाड्यापासून दिलासा मात्र, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता