Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार काही भागात पाऊस झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस झाला. तसेच कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढचे चार दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. 


ठाणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट 


राज्याच्या काही भागात जोरदार परतीचा पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईतही सकाळी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान, पुढच्या चार दिवस आणखी हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज कोकणातील तिन्ही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी


कोल्हापूर शहरामध्ये काल वादळी वारे आणि मेघगर्जनेसह परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पंचमी दिवशी भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि भात मळणीला ऐन दसऱ्यामध्येच वेग आला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तसेच काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडल्या आहेत. उजळाईवाडी ते शाहू जकात नाका ते टेंबलाई उड्डाण पूल मार्गावर जोरदार वार्‍याने अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. शिवाजी विद्यापीठ परिसरातही झाडे वाऱ्याने मोडली गेली. शहरातील शाहू मिल चौकातही झाड कोसळल्याची घटना घडली आहे.


मान्सून माघारी फिरण्यासाठी पोषक वातावरण


सध्या देशात मान्सून माघारी फिरण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच परतला आहे. अशातच, आता जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: