Maharashtra Rain : राज्यात सध्या परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं शेती पिकांनी मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा पावसाचा जोर आणखी किती दिवस कायम राहणार? असा प्रश्न सर्वांनांच पडला असेल. तर ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार
राज्यात उद्यापासून म्हणजे 28 सप्टेंबरपासून आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 5 ऑक्टोबरपर्यंत खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर व मराठवाड्यात अशा 18 जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तसेच मुंबईसह कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात मात्र अशा प्रकारची उघडीपीची परिस्थिती ही 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यानच्या पाच दिवसात जाणवू शकते असे खुळे म्हणाले.
काही ठिकाणी पुराचा धोका
येत्या तीन दिवसात कोकणातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे व उपनगर, पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा 7 जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अशा 6 जिल्ह्यात अशा एकूण 13 जिल्ह्यातील तापी, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात मात्र पूर पाण्याची तीव्रता वाढू शकते अश माहिती मामिकराव खुळे यांनी दिली आहे.
ऑक्टोबरमधील पाऊस स्थिती काय असणार?
सहा ऑक्टोबरनंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून 13 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आठवडाभर महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे 16 ऑक्टोबरनंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालु होत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याअखेर दरम्यानही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे खुळे म्हणाले. दरम्यान, यावर्षी हवामान विभागानंं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. विशेष म्हणजे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या: