Maharashtra Rain News : नैऋत्य मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याने राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित भागात पावसाने जोर धरला आहे. पुढील पाच दिवस पावसाची हीच स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही दाखल झाला आहे. तसेच उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे.
कोकण विभागात आज मुसळधार पाऊस
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी, तर एखाद्या भागात तीव्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 21 जूनला पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता असून, मध्यम पाऊस कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दोन्ही दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणे, नाशिक, सातारा या घाटमाथ्यांच्या भागाततही जोरदार पावसाची शक्यता
पुणे, नाशिक, सातारा या घाटमाथ्यांच्या भागात आज 20 जून रोजी काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस, तर 21 जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा आणि रस्ते बंद होण्याचा संभाव्य धोका असल्याने स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक शहर, अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर या भागांमध्ये 20 जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
21 जूनला पावसाचा जोर काहीसा कमी होणार
21 जूनला पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत आज 20 जून रोजी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होईल.
महत्वाच्या बातम्या:
Hinjewadi Heavy Rain: हिंजवडीचं पुन्हा वॉटर पार्क झालं; रात्रीची परिस्थिती आवाक्यात, सकाळी मार्ग खुला, पावसाळ्यापूर्वीच्या कामात प्रशासन अपात्र