Maharashtra Rain : राज्यात काही ठिकाणी पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. गणपतीच्या आगमनाबरोबरच राज्यात पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच रायगड पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत पावसानं धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर नाशिक, वर्धा या ठिकाणी देखील पावसानं हजेरी लावली आहे. 


नाशिक पाऊस, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून  सतर्कतेचा इशारा 


सलग तीन दिवसांच्या  मुसळधार पावसामुळे नाशिकच्या (Nashik Rain)  गोदावरी नदीच्या (Godavari River)  पाणीपातळीत मोठी वाढ  झाली आहे. रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिर, रामसेतू पाण्याखाली गेली आहेत. गंगापूर धरणातून सहा हजार क्यूसेक्स वेगाने गोदापात्रात विसर्ग करण्यात आला आहे.  पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात होणार वाढ करण्याच येणार आहे. त्यामुळे  नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळं जिल्ह्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.  पुराची ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पावसाने हजेरी लावल्याने सकाळपासून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारनंतर 6 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी गोदापात्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास विसर्गात वाढ होणार आहे. 


शिर्डीत जोरदार पाऊस


अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरात धुवाधार पाऊस झाला आहे.या पावसामुळं ओढे-नाले तसेच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. शिर्डीतील शासकीय विश्रामगृह, प्रसादालय आणि महावितरण कार्यालयास पाण्याचा वेढा पडला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यांवरील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक ठिकठिकाणी पाणी साचले आहे. शिर्डीसह संगमनेर, कोपरगावसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.


वाशिम जिल्ह्यात कधी पाऊस तर कधी धुक्याची चादर


वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसा पासून वारवरणात चांगलाच बदल पाहायला मिळत आहे. दिवसा तापमानाचा पारा 32 अंशापर्यंत तर कधी पाऊस तर सकाळी अनेक भागात धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. वाशिम मंगरुळपिर मार्गावर दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली. 


महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस


महाराष्ट्रात आत्तापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावासानं हजेरी लावली आहे. 1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत राज्यात सरारीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं (Meteorological Department) दिली आहे. सांगली जिल्हा सोडता संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर सर्वाधिक पाऊस नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाला आहे. तिथे सरासरीच्या 53 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.