Maharashtra Rain : शुक्रवारपासून म्हणजे 5 ऑगस्टपासून अपेक्षित असलेल्या मान्सूनची (Monsoon) सक्रियता एक दिवस आधीच सुरु होणार आहे. आजपासूनच (4 ऑगस्ट) राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी उघडीप मिळाल्यानंतरची कामं त्वरित उरकून घ्यावीत, असे आवाहन निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी केलं आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 10 जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
4 ते 12 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता
कोयना धरणासहित कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट-माथ्यावरील तसेच नाशिक-नगर जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रात जोरदार पावसाच्या शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातील भाजीपाला तोडणी, काढणी, विक्री वा साठवणूक करण्याचा विचार ह्या दोन दिवसात लगेचच करावा लागण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये देखील आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासून पुन्हा मान्सून मूळ जागेवर किंवा त्यापेक्षाही अधिक दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. दरम्यान, चेन्नई, नेल्लोर, मच्छलिपटणम ह्या शहरादरम्यान बंगालच्या उपसागरात पूर्व किनारपट्टीसमोर जमिनीपासून 1 किमी अंतरावर असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळं मान्सून 4 ते 12 ऑगस्ट या 12 दिवस महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात सक्रिय राहण्याची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले.
राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी
सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच देशातील विविध भागात देखील दमदार पाऊस पडत असताना दिसत आहे. देशातील कर्नाटक, केरळसह राजधानी दिल्लीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर राज्यातील मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा, धुळे, लातूर या परिसारत पाऊस झाला आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती सतर्कता बाळगावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :