Maharashtra Rain : सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसानं (Rain) दडी मारली आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. खरीपाची पिकं वाचवण्यासाठी राज्यातील शेतकरी (Farmers) चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


'या' भागामध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण वाढणार


सध्या पावसानं उघडीप दिली आहे. मात्र, पुढील चार चे पाच दिवसात राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळं उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 


मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट 


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मराठवाड्यासह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 


पावसाचा मोठा खंड 


जून महिना कोरडा गेला. त्यात जुलै महिन्यात थोडाफार पाऊस झाल्यानं पिकांना जीवनदान मिळालं होतं. मात्र, ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला. त्यामुळं पावसाचा मोठा खंड पडला आहे. चालू असलेल्या सप्टेंबर महिन्यात देखील पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. राज्यातील 453 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड, तर 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांपासून पाऊसच पडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागात पिकांची बिकट परीस्थिती असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत जर पाऊस झाला नाही तर ही पिकं पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात चांगला पाऊस नसल्याने अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. ग्रामीण भागातील पाझर तलावातील पाणी देखील आटले आहे.


पावसाची ओढ शेती पिकांना फटका 


शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे. तूर, सोयाबीन, मका, कांदा, फळबागा इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मागील महिन्यात पावसाचा 21 दिवसापेक्षा अधिक खंड पडला होता. त्यामुळं पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागात पिकांचे नुकसान हे 50 टक्यांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. तर काही भागात शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Solapur : पावसाचा खंड, पाण्याअभावी सोलापूर जिल्ह्यात 50 टक्क्याहून अधिक पिकांचं नुकसान; सोयाबीनसह तूर आणि मकेला फटका