Maharashtra Rain Live Updates : मुसळधार पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली
Maharashtra Rain Live : मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आजही राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्याभरात पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसानं शहरातील रस्त्याना नद्यांचे रूप आल असून उड्डाण पुलासह शहरातील महत्वाच्या रस्त्यावर जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसामुळे शहरातील सराफ बाजारात पाणी साचलं आहे. त्यामुळे गणेशभक्तांची तारांबळ उडाली आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या तासाभराच्या पावसात चक्क कल्याण डोंबिवली महापालिकेचे मुख्यालय तुंबल्याचे दिसून आलं. मुख्यालयाच्या आवारात पाणी साचल्याने पालिकेत पार्क केलेली दुचाकी काढताना कर्मचारी तसेच नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली .
कल्याण-डोंबिवली आणि ठाणे परिसरात मागील तीन तासात धुंवाधार पाऊस.
ऐरोली परिसरात 84 मिमी पावसाची नोंद, तर वाशी परिसरात 74 मिमी पावसाची नोंद.
डोंबिवलीत मागील 3 तासात 60 मिमी पावसाची नोंद.
ठाण्यातील चिराक नगरमध्ये 77 मिमी, ढोकळीमध्ये 73 मिमी पावसाची नोंद
कोपरी आणि नौपाडा परिसरात 100 मिमीहून अधिक पाऊस
मुंबईतील भांडूप परिसरात देखील पावसाची चांगली हजेरी, भांडूप कॉम्प्लेक्सच्या केंद्रावर 80 मिमी पावसाची नोंद
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या जीवनवाहिनीला बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने कुर्ला रेल्वे स्थानकात अप आणि डाऊनच्या दिशेने दोन्ही फलाटांवर गर्दी झाली आहे. ऐन घरी जाण्याच्या वेळेस झालेल्या या खोळंब्याने चाकरमान्यांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. मात्र आता पावसाने थोडी उसंत घेतल्याने वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
मुंब्रा कळवा भागात झालेल्या प्रचंड पावसामुळे पारसिक डोंगरावरून पाण्याचे मोठे प्रवाह थेट रेल्वे ट्रॅकवर आले. मध्य रेल्वेच्या ट्रॅक बाजूलाच पारसिकचा डोंगर असल्याने हे पाणी थेट ट्रॅक वर येत होते. पावसाचा जोर जसा कमी झाला तसे पाणी देखील कमी झाले. मात्र यामुळे मध्य रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅक वरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे बंद ठेवण्यात आली होती. पाणी ओसरल्याने ही वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे नाशिकच्या उड्डाणपुलावरील रस्त्यांना आले नदीचे रूप
आडगाव - द्वारका मार्गावर पाण्यात अनेक वाहने बंद पडलीत, अंबुलन्सही अडकल्या
जवळपास 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
Mumbai Rain : गेल्या तासाभरापासून अंधेरीतील तेली गल्ली परिसरात वाहतून कोंडी झाली आहे. वाहणांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अनेक प्रवासी अडकले आहेत. कवी सौमित्रदेखील तेली गल्ली परिसरात अडकले असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
Thane Rain : ठाणे, कळव्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्यरेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे.
Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस आहे. पाणी साचल्याने अंधेरी सबवे (Andheri Subway is closed) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतूक गोखले ब्रीजकडून एस व्ही रोडकडे वळवण्यात आली आहे
नांदेड जिल्ह्यात जून ते जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत जोरदार पाऊस झालाय. जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जिल्हाभरात जोरदार अतिवृष्टी झाली. दरम्यान या दोन महिन्यात नांदेड जिल्ह्यात तब्बल 850 मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली व जिल्हा भरातील छोटेमोठे 36 प्रकल्प तुडुंब भरले. पण त्यानंतर पावसाने उघडीप घेत तब्बल एक महिना दडी मारली. ज्यामुळे बहरात आलेली सोयाबीन, उडीद, मूग, कापूस ही पिके अक्षरशः वाळून गेली. आता एक महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्हाभरात पावसाचे आगमन झाले आहे. एक महिन्याच्या उघडीपीनंतर मेघगर्जनेसह जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला असून शहरातील रस्त्या रस्त्यावर त्यामुळे पाणी साचले आहे.
परभणी जिल्ह्यात पहाटे जोरदार पडल्यानंतर काहीशी विश्रांती देत पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. परभणी, मानवत, गंगाखेड, पूर्णा, पालम, सोनपेठसह सर्वत्र विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू असून या पावसाने पुन्हा एकदा छोट्या मोठ्या नद्यांना पाणी आले आहे. गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव येथील पुलावरून पाणी जात असल्याने 7 गावांचा संपर्क तुटला आहे.
पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. जव्हार मोखाडा विक्रमगड भागात जोरदार पाऊस सुरू झालाय. तर काही भागात ढगाळ वातावरण असून पावसाची रिमझिम सुरू झाली आहे.
Raigad Rain : कोकणात पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 8 ते 12 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Ujani dam : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain)पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील उजनी धरण (Ujani dam) देखील ओव्हफ्लो झालं आहे. त्यामुळं धरनातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. उजनी धरणातून सध्या भीमा नदीत 60 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु असून, भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Raigad Rain : रायगड जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात सरासरी 71.81 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पेण येथे सर्वाधिक 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उरण येथे 125 , खालापूर 113, माथेरान 111 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधुवारी सायंकाळपासून रायगड जिल्ह्यात पावसाने विश्रांती दिली आहे.
पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे असे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.कालही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिण दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे
अहमदनगर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. उत्तर नगर जिल्ह्यापाठोपाठ दक्षिण नगर जिल्ह्यातही पावसाने जोर पकडला आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात पावसामुळं पिकांना दिलासा मिळाला असला तरी उत्तरेकडे पिकांना फटका बसला आहे. मुळा धरणातून चालू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करुन 5 हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Satara Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, सातारा (Satara) जिल्ह्यात देखील हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात 11 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हवामान विभागानं केलं आहे.
Parbhani Rain : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परभणी जिल्ह्यात पहाटे सर्वत्र जोरदार पाऊस बरसला. पहाटे चार वाजता सुरू झालेला पाऊस जवळपास एक तास जोरदारपणे बरसत होता. वादळी वारे, विजांचा गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कोमेजून जात असलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या येलदरी 100 टक्के भरला आहे. कोणत्याही क्षणी प्रकल्पाच्या विद्युत केंद्राद्वारे पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच लोअर दुधना प्रकल्प 72 टक्के भरल्याने प्रकल्पाच्या दोन्ही कालव्या मधून पाणी सोडण्यात आले आहे.
Raigad Rain : रायगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, पेण तालुक्यातील गडब परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली. पेणमध्ये 166 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर कोकणातील सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या नवी मुंबईसह पनवेल परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा कुडुस भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच दिवसभराच्या दमट वातावरणानंतर नागपुरात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
या पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे. त्यामुळं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. तसेच अमरावती जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे.
आजपासून पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगली हजेरी लावली आहे. लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -