Maharashtra Rain Live Updates : राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Rain Live Updates : राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Sep 2022 04:07 PM
Aurangabad: पावसाचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही; फळांची मोठ्याप्रमाणावर गळती

Aurangabad : औरंगाबादमध्ये शुक्रवार आणि शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही बसल्याचं पाहायला मिळाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोसंबीच्या झाडाला गळती लागली आहे. त्यामुळे झाडांखाली मोसंबीचा सडा पडला असल्याचे चित्र आहे. वारा अधिक असल्याने झाडाला लागलेले फळ गळून पडले. काही ठिकाणी गारा पडल्याने याचा फटका फळांना बसला आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस, आर्वी ते वर्धमनेरी रस्ता बंद

Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी गावाजवळ असलेल्या नाल्याला पूर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यानं आर्वी ते वर्धमनेरी हा रस्ता बंद झाला आहे. आज सकाळपासून वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतो आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.


 

यवतमाळ जिल्ह्याचत जोरदार पाऊस, शेती पिकांना मोठा फटका

Yavatmal Rain : रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात  जोरदार पाऊस पडत आहे. महागाव तालुक्याला तर पावसाने पुन्हा झोडपून काढले. काळी दौलतखान मंडळात पावसाने हाहाकार  घातला. पोखरी, वाकान, तीवरांग, अमादापुर, बोरी इजारा , कोंदरी या गावात पावसाने कहरच केला. त्यामुळं उरलेसुरले पीक धोक्यात आली आहेत. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसानं शेतातील कापूस, सोयाबीन या उभ्या पिकात पाणी साचले आहे. या पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असून शेतकरी पुरता कोलमडताा दिसत आहे. 

पालघरमधील नागझरी गावात लाजऱ्याच्या भल्या मोठ्या वृक्षावर वीज कडाडली

Plaghar Rain : पालघरमधील नागझरी गावात एका लाजऱ्याच्या भल्या मोठ्या वृक्षावर वीज कडाडल्याने या झाडाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. तर बाजूला असलेल्या घरांवर या झाडाचे लाकूड पडल्याने काही पत्रेही फुटून नुकसान झाल आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही.

पालघर जिल्ह्यात पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात

Palghar Rain : पालघर जिल्ह्यातील काही भागात पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. गेले काही दिवस कडक ऊन पडत असताना आत्ता पावसानं पुन्हा सुरुवात केल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

नागपुरात अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसाचं आगमन

Nagpur Rain : नागपुरात अनेक दिवसांच्या खंडानंतर आज सकाळपासून पावसाने पुनरागमन केले आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. नऊच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली असून, गेल्या एक तासापासून जोरदार स्वरुपाचा पाऊस होत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळं आधीच नागपुरात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र, गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पिकांसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. वातावरणात मात्र प्रचंड दमटपणा येऊन तापमानही वाढले होते. आता पावसाने पुनरागमन केल्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

Latur: लातूर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, माना टाकणाऱ्या पिकांना मिळाले जीवदान

Latur Rain Update: लातूर शहर आणि परिसरामध्ये मध्यरात्रीच्या नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ढगाच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावली. काल दिवसभर वातावरणात प्रचंड उकडा जाणवत होता. मात्र मध्यरात्रीनंतर पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसाने वीस ते पंचवीस दिवसापेक्षा जास्त उघडीप दिली होती. सोयाबीन सारखी पिके पाऊस नसल्याने माना टाकत होते. परंतु या पावसामुळे थोडासा दिलासा नक्कीच मिळाला आहे. एका तासापेक्षा जास्त काळ पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. पुढील दीड तास पावसाची सततधार सुरू होती. शहरातील अनेक भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू होता.

मुंबईतील सांताक्रूझमध्ये गेल्या 24 तासात 94 मीमी पाऊस  

मुंबईतील सांताक्रूझमध्ये गेल्या 24 तासात 94 मीमी पाऊस  

वर्ध्यात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात

वर्ध्यात आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकड्यापासून हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

करवीर तालुक्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस, ओढे नाले ओव्हरफ्लो

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. करवीर तालुक्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.  काल सायंकाळी झालेल्या पावसाने दैना उडवली आहे. तासभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळं ओढे नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. ओढ्यांवर पाणी आल्यानं वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेर लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत. 
दरम्यान, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


दरम्यान, रात्रीपासूनच मुंबईसह परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पावसाचा कमी झालेला जोर पुन्हा वाढला आहे. त्याचबरोबर नाशिक  (Nahsik) जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. 


औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान


औरंगाबाद जिल्ह्यात कालपासूनच अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात गारांचा पाऊस झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा पावसानं चांगली हजेरी लावली आहे.


जालना जिल्ह्यातही पावसाची हजेरी


जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडे उन्मळून पडली आहेत. वडीगोद्री परिसरात झाडे पडली असून घरावरील छप्पर देखील उडाले आहे. तसेच काही ठिकाणी घरावरील पत्रे देखील उडाले आहेत. दरम्यान बऱ्याच दिवसानंतर ओढ दिलेल्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवनदान मिळालं आहे.


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.