Maharashtra Rain Live Updates : नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, शेतकऱ्यांची पिकं संकटात

Maharashtra Rain Live : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आजपासून पुन्हा चार दिवस  मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jul 2022 03:25 PM
आष्टी तालुक्यातील गावांमध्ये घुसले पाणी

Wardha Rain : वर्धा जिल्ह्यातही सकाळपासून संततधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं आष्टी तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आल्यानं लहान आर्वी, नवीन आष्टी, साहूर, धाडी येथे गावात पाणी शिरले आहे. आष्टी तालुक्यात सकाळपासून सतत पाऊस सुरु आहे.

जळगाव जिल्ह्यातील निंबा धरण ओव्हरफ्लो, पर्यटकांसाठी आकर्षण




Jalgaon Rain : जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वत रांगामध्ये गेल्या आठवडाभरपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाचा परिणाम म्हणून यावल तालुक्यात असलेल्या निंबा धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यानं भोनक नदीवर असलेले निंबा देवी धरण ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळत आहे. सातपुडा पर्वत रांगामध्ये असलेल्या या धरण परिसरात निसर्गरम्य वातावरण असल्यानं पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे.

 

 



 


नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, शेतकऱ्यांची पिकं संकटात

नांदेड जिल्ह्यात तब्बल दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर पावसानं थोडी उसंत घेतली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे उरकून घेण्यास थोडीफार सवड मिळाली होती. गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. या जोरदार पावसामुळं शेतात व रस्त्यावर सगळीकडं पाणीच पाणी झालं आहे. या सततच्या पावसामुळं पिकं वाचवण्याचं मोठं संकट शेतकऱ्यांपुढं उभं राहिलं आहे. 

विदर्भात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

विदर्भात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

चंद्रपुरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु, इरई धरणाची 2 दारे उघडली

चंद्रपुरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. इरई धरणाची 2 दारे 0.25 मीटरने उघडली आहेत. गेले दहा दिवस चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं सुमारे 60 हजार हेक्‍टरवरील पिकांचं झालं आहे. तर वर्धा नदीकाठच्या गावांमध्ये या अतिवृष्टीने हाहाकार केला आहे. त्यामुळं शेतकरी व नदीकाठच्या वसाहतीत राहणारे नागरिक संकटात सापडले आहेत. 

दिल्लीत पावसाची दमदार हजेरी

Delhi Rain : दिल्लीच्या काही चांगलाच पाऊस पडत आहे. दिल्लीतील रिंग रोड, मोती बाग या परिसरात चांगला पाऊस झाला आहे. 


 





पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्यात बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळं शेती  पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अशातच, आजपासून चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना खरबदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


राज्यात झालेल्या पावसामुळं शेतकरी आनंदी आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसानही झालं आहे. तर काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, मागील दोन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पूरस्थिती होती, त्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावासाचा जोर कमी झाल्यामुळं शेतीच्या कामांना वेग आला आहे.


दरम्यान, आजपासून चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.  मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुवाधार पावसानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. मोजक्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तर उर्वरित ठिकाणी पावसानं उघडीप घेतली होती. मात्र, अशातच आता हवामान विभागानं आजपासून मुसळदार पावासाचा इशारा दिला आहे. त्यामुळं राज्यात उघडीप दिलेला पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे. 


यवतमाळ 


यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळं हाहा:कार सुरु आहे. यवतमाळमधील जवळपास 37  गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील झोला या संपूर्ण गावालाच पुरानं वेढा दिला आहे. त्यामुळं या गावातील सर्वच लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. तर पुराचा फटका बसलेल्या यवतमाळमधील जवळपास साडेतीन हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थरांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पुराने अक्षरश: नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 


वणी तालुक्यातील भुरकी, जुनाड, कवडशी, सावनगी, शिवणी, चिंचोली,  जुगाद, सेलू, झोला रांगणा, कोना, पिंपळगाव, नायगाव, उकणी , शेलू, कवडशी, शिवणी,  चिंचोली या गावांना पुराचा वेढा बसला होता. लोकांना बोटी द्वारे बाहेर काढण्यात आले. शिवणी आणि चिंचोली  गावातील नागरिकांची कैलासनागर येथील सांस्कृतिक हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या भागात दौरा करून ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक बाबीचा आढावा घेतला. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.