Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी, मात्र, भंडारा-गोंदियासह चंद्रपूर आणि गडचिरोलीत पूरस्थिती 

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, विदर्भात काही ठिकाणी पाऊस कोसळताना दिसत आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Aug 2022 10:43 AM
पुढील तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
Ratnagiri Rain : पुढील तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 
अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, लहान मोठे धरण, बंधारे ओव्हरफ्लो

अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं भंडारदरा धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे धरण व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. 

78 तासानंतर वैनगंगा नदी सामान्य पातळीवर, गोसेखुर्दचा विसर्ग सुरु असल्यानं नदी काठावरील गावांना इशारा

अखेर 78 तासानंतर वैनगंगा नदी झाली शांत झाली आहे. पुराचे पाणी ओसरले आहे. नदीने आपली सामान्य पाणी पातळी गाठली. मात्र, गोसेचा अद्याप विसर्ग सुरु असल्याने नदी काठावरील गावांना इशारा दिला आहे. भंडारा जिल्हाला आलेला पुराचा धोका टळला असून अखेर 78 तासानंतर वैनगंगा नदी शांत झाली आहे. दरम्यान, भंडारा आणि कारधा नदिला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन पुलावरील पाणीही ओसरले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात या पुराचा 40 गावांना फटका बसला होता. तर 3 हजारच्यावर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची वेळ आली होती. मात्र, आता पूर ओसरल्याने हळूहळू सर्व स्थिती पूर्वपदावर येणार आहे. दरम्यान, पूर ओसरल्याने जिल्हा प्रशासनद्वारे युद्ध पातळीवर पंचनामें सुरु झाले आहेत. 

जायकवाडी धरणातून यावर्षी पहिल्यांदाचा 75  हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग 

जायकवाडी धरणातून सुरु असलेल्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली आहे. सद्या 75 हजार 456 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळं पैठण तालुक्यातील नदी काठाच्या 14 गावांना याचा फटका बसणार आहे. तर पाण्याची आवक वाढल्यास या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 10 ते 27 अशा अठरा दरवाज्यातून 4 फुट उंचीवरून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर जायकवाडीत सद्या एकूण 72 हजार 478  क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु आहे.

आलापल्ली-भामरागड मार्ग वाहतुकीसाठी मोकळा, भामरागडमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल

Gadchiroli Rain : आलापल्ली-भामरागड मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. छत्तीसगड राज्यात मुसळधार पावसामुळं पार्लकोट इंद्रावती नदीला प्रचंड पूर आला होता. त्यामुळं भामरागड गावात पुराच्या पाण्याने शिरकाव केला होता. अनेक घरे पाण्याखाली आली होती. भामरागड गावाला बेटाच स्वरुप आलं होतं. मात्र, आता पूर पुर्णपणे ओसरला असून गावात पुरामुळं मोठया प्रमाणात चिखल पसरला असून ते काढण्याचं काम सुरू आहे. तर पार्लकोट नदीच्या  पुलावर देखील चिखल लाकूड असल्याने ते देखील साफ करण्याचं काम सुरू आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या काही भागात सध्या रिमझीम पाऊस सुरु आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळं काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. नागरिकांना देखील खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडं मुंबईसह परिसरात देखील चांगला पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आजपासून पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. 


नाशिक पाऊस


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक मध्यम धरणे शंभर टक्के भरली असून, धरणांमधील एकूण सरासरी जलसाठा 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गंगापूर धरण (Gangapur Dam) 94 टक्के भरल्यामुळे मंगळवार दुपारपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर बुधवारी सकाळी 3000 क्यूसेकने विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरीच्या (Godavari) पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह शहर परिसरात पावसाची संततधार सुरूच असून गंगापूर पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला आहे. यामुळं गंगापूर धरण संवाद झपाट्याने वाढ झाली आहे, त्याचबरोबर गंगापूर धरणातही पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळं गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येत आहे.


औरंगाबाद पाऊस


धरणांमधील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam) पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून एकूण 47 हजार 760 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर धरणाजवळील पैठण-शेवगावला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. तर गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


भंडारा गोंदियात पूरस्थिती


भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.  वैनगंगा नदीला पूर आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं आणि गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे लाखांदूर तालुक्यातील वाहणाऱ्या चूलबंद नदीवरील सर्व पुल पुराच्या पाण्याखाली आले आहेत. यात लाखांदूर, भागडी चीचोली, मांढाल दांडेगावर, बोठली धरमापुरी, ताई बार्व्हा, दिघोरी मोठी पालांदुर पुलाचा समावेश असून प्रत्येक पूल पुराच्या पाण्याखाली आल्याने तालुक्यातील अनेक गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. तर लाखांदूर ते वडसा या राष्ट्रीय महामार्गावरील चाप्राळ ते सोनी रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने भंडारा ते गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. तर लाखांदूर तालुक्यातील आवली, पारसोडी,पाऊलाडवणा, या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून पुराचा धोका वाढलेला आहे. या पावसाच्या पुराच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना काल सुट्टी दिली होती.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.