Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी, कोकणसह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 10 Aug 2022 03:59 PM
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. मुंबईसह...More
Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. मुंबईसह परिसरात देखील जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच दुसरीकडे राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढचे दोन ते तीन 3 दिवस राज्यात पाऊस सक्रीय राहणार आहे. यामध्ये पालघर, दक्षिण कोकण, पुणे आणि पूर्व विदर्भात रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई ठाणे, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही भाग ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.कोकणात मुसळधार पाऊसकोकणात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं नदी नाले ओसंडून वाहत आहेत. काल सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात झाली. लांजामध्ये 330 मिमी, मंडणगडमध्ये 170 मिमी, देवरुख 140 मिमी, चिपळूण 140 मिमी, रत्नागिरीत 130 मिमी पाऊस, तर रायगडातील ताळामध्ये 210 मिमी, म्हसळात 190 मिमी, माणगावात 160 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.मुंबईतही जोरदार पाऊसबंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत आहे. त्यामुळं राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईसाठी आजही (10 ऑगस्ट) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिवृष्टीमध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील अतिवृष्टी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीत 200 मिमी, साताऱ्यातील महाबळेश्वरामध्ये 190 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शाहूवाडीत 150 मिमी, लोणावळ्यात 140 मिमी पावसाच्या नोंदीसोबत अतिमुसळधारेची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वैजापूर, कन्नड, लोहारा, भोकरदनमध्ये 30 मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भात अतिवृष्टीची शक्यतादरम्यान आज विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गोंदियात पाण्यात अडकलेल्या जोडप्याला दोर आणि लाकडाच्या सहाय्याने वाचवण्यात यश
Gondia Rains : गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसामुळे तिरोडा तालुक्याअंतर्गत येत असलेल्या पांजरा येथील नाल्याच्या पुरात अडकलेल्या जोडप्याला लाकडाच्या सहाय्याने वाचवण्यात यश आलं. बुरुड समाजाच्या जोडप्याला पांजरा इथल्या रामेश्वर चौधरी आणि प्रदीप मडावी या दोन तरुणानी वाचवलं. सुरेश ऊके आणि उर्मिला ऊके हे दोघे पुराच्या पाण्यात अडकले. या दोघांना दोर बांधून लाकडावर बसवून अडकलेल्या ठिकाणावरुन सुरक्षित ठिकाणी आणलं. हे जोडपं शेतशिवारात असलेल्या विटाभट्टीवर काम करण्यासाठी गेले होते. रात्रीपासून शेतात अडकून होते.
नागपूर जिल्ह्यातील पोहरा नदीला पूर, विहीर गावात शिरलं पाणी
नागपूर जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे पोहरा नदीला पूर आला आहे. त्यामुळं शहरालगतच्या विहीर गावात पोहरा नदीचे पाणी घुसले आहे. या गावाच्या परिसरातील काही जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना NDRF च्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. 12 ते 15 जणांचे रेस्क्यू ऑपरेशन NDRF टीमने यशस्वीपणे राबवले आहे.
ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला
हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर धरण पूर्ण क्षमतेनं भरले आहे. ईसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी पात्रात करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात आल्यामुळे हिंगोली ते पुसद रोडवरील शिऊर गावाजवळ असलेल्या पुलावरून पाणी जात आहे. तीन ते चार फूट इतके पाणी पुलावरून जात असल्यानं कालपासून हिंगोली ते पुसद वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळं वाहनांच्या सुद्धा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्यानं नदीकाठच्या शेतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरले आहे. परिणामी शेतकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दहा हून अधिक मुख्य व इतर छोटे मार्ग बंद
Gadchiroli Rain : गडचिरोली जिल्ह्यात पावसाने सकाळपासून विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यातील 10 हून अधिक मुख्य व इतर छोटे मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये मुख्य मार्ग आलापल्ली-भामरागड, आरमोरी- गडचिरोली, आष्टी-चंद्रपुर, यांचा समावेश आहे. दुसरीकडे भामरागडच्या पार्लकोटा नदीला आलेल्या पुराचा पाणी शहरात शिरलं असून भामरागडच्या मुख्य बाजारपेठातील अनेक दुकाने आणि घरे पाण्याखाली आहेत. तर भामरागडला लागून असलेल्या गावातील लोकांना तहसील मुख्यालयात येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भामरागड लाहेरी मार्गावरील एका छोट्या नाल्याला पुराचे पाणी आल्याने पाण्यातून जीवघेणा प्रवास करत तहसील मुख्यालयाला यावं लागत आहे.
नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तांडा गावात सूर नदीचे पाणी शिरलं
नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मौदा तालुक्यात तांडा गावात सूर नदीचे पाणी शिरले आहे. अनेक गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरुन धान्याचे तसेच घरातील वस्तुंचे मोठं नुकसान झालं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कालपासून पूर असतानाही आतापर्यंत प्रशासनाकडून कोणीही तिथे पोहोचले नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.
नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामधून जवळपास 3 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान खात्याने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सेलू तालुक्यातील सुरगाव येथे वाघाडी नदीला पूर, सुरगाव मार्ग बंद
Wardha Rain : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सुरगाव येथे वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे, सुरगाव मार्ग बंद झाला आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतानाही शेतकरी शेतात जाण्यासाठी जीवघेणं प्रवास करत आहेत. तीन दिवसांपासून सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून सुरेगाव रस्त्यावर काल सायंकाळपासून वहिवाट ठप्प झाली आहे. तरीदेखील शेतातील गुरेढोरांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
कापसी महालगाव परिसरात नाग नदीला पूर, भात शेतीचं मोठं नुकसान
Nagpur Rain : नागपूर भंडारा रोडवर कापसी महालगाव परिसरात नाग नदीला पूर आला आहे. त्यामुळं नाग नदीचे पाणी पात्र सोडून अवतीभवतीच्या धानाच्या ( तांदूळ ) शेतात शिरलं आहे. त्यामुळं धानाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागपूर शहरातून अवघ्या काही फुटांचा पात्र असलेली नाग नदीने महालगाव परिसरात विक्राळ रुप धारण केले आहे. त्यामुळं नाग नदीचा पाणी नेहमीचा पात्र सोडून अवतीभवतीच्या कित्येक किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरल्यामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. महालगावमध्ये काही घरांमध्येही नाग नदीचे पाणी शिरल्यामुळं नागरिकांच्या घरगुती साहित्याचेही नुकसान झालं आहे. नाग नदीच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर भाजीची शेती होती. ती भाजी नागपूर शहराला पुरवली जाते. या पुरामुळं भाज्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. नागपूर शहरात वीस-पंचवीस फुटांचा पात्र असलेली नाग नदीने महालगाव परिसरात मोठं स्वरुप घेतलं आहे.
मुसळधार पावसामुळं कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद
मुसळधार पावसामुळं कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. केर्ली जवळ पाणी आल्याने रत्नागिरीला जाणारा मार्ग बंद केला आहे. गगनबावड्या नंतर कोकणात जाणारा दुसरा मार्ग देखील बंद झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील कास परिसरात मुसळधार पाऊस, सातारा-कास-बामणोली रस्ता बंद
satara Rain : सातारा जिल्ह्यातील कास परिसरातील पाऊस आणखी वाढला आहे. या पावसामुळं सातारा-कास-बामणोली रस्ता बंद केला आहे. हा रस्ता संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळं हा निर्णय घेतला आहे. ऑरेंज अलर्ट, रेड अलर्टमुळं विकेंडच्या दिवशी पर्यटन स्थळे पूर्णपणे बंद राहणार आहेत. इतर दिवशीही पर्यटन स्थळावर जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. दुगारवाडी धबधबा परिसरातील दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच धोकादायक पर्यटन स्थळावर यंत्रणेचा पहारा राहणार आहे. दुगारवाडी धबधबा परिसरात 22 पर्यटक अडकले होते. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्यानं जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे.
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी
Nagpur Rain : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात तांडा परिसरात मोठ्या नाल्याचे पाणी शिरले आहे. त्यामुळं गावातील अनेक रस्त्यांवर आणि घरांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लोकांच्या घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे. तिकडे मौदा तालुक्यात सूर आणि कन्हान नदीकाठी असणाऱ्या सखल भागातही पाणी शिरले आहे. बोरगाव, खात, तारसा या गावातील सखल भागात असलेल्या अनेक घरात पाणी शिरले आहे.
लोणावळ्यात पुन्हा एकदा वरुणराजाची जोरदार हजेरी, गेल्या 24 तासात 218 मिमी पावसाची नोंद
लोणावळ्यात पुन्हा एकदा वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे, नदी, नाले, धबधबे वाहू लागलेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. गेल्या 24 तासात 218 मिमी पावसाची नोंद झाली असून, दमदार पाऊस झाल्याने पाणी ओसंडून वाहू लागल आहे. धबधबे देखील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. लोणावळ्यात आत्तापर्यंत 3408 मिमी पाऊस कोसळला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे.
गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
Gondia Rain : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केल्याने जिल्ह्यात मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग यांना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. आदेशाचे उलंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
भंडारा-मध्य प्रदेश राज्यमार्ग मोहाडी शहराजवळ जलमय, वाहतूक बंद
भंडारा-मध्य प्रदेश राज्यमार्ग मोहाडी शहराजवळ जलमय झाला असून रस्त्यावरुन दीड ते दोन फूटावरुन पाणी वाहू लागले आहे. मोहाडीजवळ भंडारा- मध्य प्रदेश मार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे या मान्सून सत्रात दुसऱ्यांदा हा मार्ग बंद झाला आहे. यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या वाहणाची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाली आहे. मोहाडी येथील चंदुबाबा नाल्याचे पुराचे पाणी मोहाडी शहरातील बसस्थानक परीसरात साचल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून भंडारा-तुमसर वरील मार्गवरील वाहतूक तात्पुरता बंद झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेकांच्या घरात शिरलं पाणी
Gondia Rain : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. भारतीय हवामान खात्याने गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केल्याने जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे.
वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वर्धा नदीला पूर, आर्वी देऊरवाडा अमरावती मार्ग बंद
Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळं लोखंडी संरक्षण कठडे देखील वाहून गेले आहेत. त्यामुळं आर्वी देऊरवाडा अमरावती मार्ग बंद करण्यात आला आहे. डांबराचे थर वाहून गेले आहेत.
अतिवृष्टीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा निर्णय
Kolhapur Rain : अतिवृष्टीमुळे परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं घेतला आहे. 10 आणि 11 ऑगस्टला परीक्षा होणार होत्या. त्या आता पुढे ढकलल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात कोयना वगळता इतर सर्व धरणे ओवरफ्लो
सातारा जिल्ह्यात पाऊसाचा जोर कायम असून यामुळे जिल्ह्यातील कोयना वगळता इतर सर्व धरणे ही ओवरफ्लो झाली आहेत. तर कोयना धरणही भरण्यासाठी अवघा काही कालावधी लागणार आहे. वाई तालूक्यातील बलकवडी धरण 100% भरले असून बलकडी धरणातून धोम धरणात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे.
नागपूरमधील भालदारपुरा परिसरातील शिवमंदिराचा काही भाग कोसळला, पाच जण जखमी
Nagpur News : नागपूर शहरातील गंजीपेठ येथील भालदारपुरा परिसरातील शिवमंदिराचा काही भाग कोसळला आहे. शेजारी असलेल्या 3 घरांवर मंदिराचा काही भाग कोसळल्याने पाच जण जखमी झाले आहेत. पाच महिन्याचे बाळही मलब्याखाली अडकले होते. आजूबाजूचे लोक वेळेतच धावून आल्याने मलब्याखाली दबलेल्या सर्वांना तातडीने बाहेर काढण्यात आले. सर्वांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. महानगरपालिकेचे पथक मलबा हटवण्याचे काम करत आहे. सकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यानची घटना घडली.
Sangli Rains : सांगली जिल्ह्यातील कृष्णेची पाणी पातळी 23 फुटांवर पोहोचली. दुसरीकडे चांदोली धरण 85 टक्के भरल्याने विसर्ग वाढवत तो 9448 क्यूसेक्स करण्यात आला आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहोचली, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहोचली आहे. दुसरीकडे चांदोली धरण 85 टक्के भरल्याने चांदोली धरणातील विसर्ग वाढवत तो 9448 क्यूसेक्स करण्यात आला आहे. कृष्णा आणि वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबईत रात्रभर पाऊस, अद्याप पाणी भरल्याची तक्रार नाही; रस्ते वाहतूक मंंदावली, लोकल वाहतूक सुरळीत
Mumbai Rains : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये रात्रभर पाऊस सुरु होता. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात आता देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. मात्र या पावसामुळे कुठेही पाणी भरण्याची तक्रार अजून प्राप्त झालेली नाही. मात्र पावसाचा जोर वाढल्यास सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रस्ते वाहतूक पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांचा वेग थोडासा मंदावलेला दिसून येत आहे. मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवली ते गोरेगावच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच पूर्व मुक्त मार्ग देखील वाहतुकीसाठी सुरळीत आहे.
लोकल वाहतूक मुंबईच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक देखील सुरळीत आहे. पावसाची रिपरिप सुरु असली तरी कुठेही पाणी साचलेले नाही. त्यामुळे लोकल वाहतुकीवर पावसाचा परिणाम झालेला नाही.
सातारा जिल्ह्यातील मराठवाडी धरण शंभर टक्के भरले, नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा
Satara Rain : सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. या धरणाचे चारही वक्र दरवाजे खुले ठेवण्यात आले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास वांगनदी धोक्याच्या पातळी ओलांडू शकते. त्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मराठवाडी धरणाच्या जलाशयाच्या काठावरील उमरकांचन, मेंढ येथील अनेक धरणग्रस्त कुटुंबांचे स्थलांतर करुन त्यांना निवारा शेडमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या उमरकांचन गावात सध्या पाणी घुसू लागले आहे. गावातील अनेक कुटूंबे घराला कुलपे लावून निवारा शेडमध्ये राहण्यास गेली आहेत.
कास परिसरात मुसळधार पाऊस, गेल्या 24 तासात 240 मिलिमिटर पावसाची नोंद
satara Rain : कास परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासात तब्बल 240 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. कासच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील वीर धरणाचे दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
satara Rain : सातारा जिल्ह्यातील वीर धरणाचे दरवाजे उघडले आहेत. वीरधरणाच्या पाच दरवाजातून 24 हजार 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर आणखी पाणी सोडण्यात येणार आहे.
राधानगरी धरण 100 टक्के भरले, कोल्हापूरकरांची पाण्याची चिंता मिटली
Kolhapur Rain : कोल्हापुरातील राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा उघडला आहे. पहाटे साडेपाच वाजता हा दरवाजा उघडला आहे. एका दरवाज्यातून प्रतीसेकंद 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. पावर हाऊस मधून सोळाशे क्यूसेकचा विसर्ग सुरूच. राधानगरी धरणातून एकूण 3028 क्युसेक विसर्ग पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. भोगावती नदीकडच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरल्याने कोल्हापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली
रत्नागिरीत जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, वाशिष्टी नदीचं पाणी पात्राबाहेर
Ratnagiri Rain : गेले दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शहरातून वाहणारी वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने पाणी नदी पात्राबाहेर आले आहे.. त्यामुळे जवळच असणाऱ्या नदीकाठच्या दुकानात पाणी शिरले आहे.
नागपूरच्या ग्रामीण भागात दमदार पाऊस, खिंडसी तलाव ओव्हरफ्लो
Nagpur Rain : नागपूरच्या ग्रामीण भागात गेले काही दिवस दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे रामटेक जवळील खिंडसी तलावसुद्धा ओव्हरफ्लो झाला आहे. विशेष म्हणजे नऊ वर्षानंतर खिंडसी तलाव ओव्हरफ्लो झाला असून, लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.