मुंबई : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. पुढील 24 तासात मुंबईसह, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे. काल मुंबईत 142.6 मिमी पावसाची नोंद झाली होती.
राज्यात मागील 24 तासांमध्ये (19 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात 142.06 मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात 134.1 मिमी, पालघर 120.09 मिमी, ठाणे 90.03 मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात 60.05 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
पावसाची सरासरी आकडेवारी
ठाणे 90.03 रायगड 134.1, रत्नागिरी 60.09, सिंधुदुर्ग 9.4, पालघर120.9, नाशिक 40.03, धुळे 25.5, नंदुरबार 33.4, जळगाव 4.7, अहिल्यानगर 8.7 पुणे 29.3, सोलापूर 0.3, सातारा 17.07, सांगली, कोल्हापूर12.1, छत्रपती संभाजीनगर 4.5, जालना 2.1, बीड 0.2, धाराशिव 0.2, नांदेड 0.6, परभणी 0.5, हिंगोली 0.8, बुलढाणा 3.1, अकोला 8.6, वाशिम 1.7 अमरावती 5.9, यवतमाळ 1.2, वर्धा 3.2, नागपूर 0.7, भंडारा 0.3,चंद्रपूर 4.3 आणि गडचिरोली जिल्ह्यात 0.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका नदीने धोका पातळी व पाताळगंगा नदीने इशारा पातळी पार केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी पार केली असून. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील नारुर गावातील हातेरी नदीवरील रस्ता वाहून गेला आहे. जवळील लोखंडी पूलावरून नागरिकांचे दळणवळण चालू आहे. मौजे कुचंबे ता. संगमेश्वर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने तहसीलदार संगमेश्वर यांच्यामार्फत योग्य कार्यवाही करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात तुफान पाऊस
रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढला आहे. आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळं रायगड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका रोहा आणि सुधागड तालुक्यातील पाली नागोठणे शहरामध्ये बसलेला पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातल्या कुंडलिका आणि सुधागड तालुक्यातल्या पाली विभागातून जाणाऱ्या अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे सकल भागात पाणी साचलं आहे. नागोठणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे येथील नागरिक आता सुरक्षित स्थळी जात आहेत. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.