मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता, त्या व्हिडीओसोबत गोगावले यांनी अघोरी पूजा केली असा दावा मोरोंनी केला होता. त्यानंतर आता भरत गोगावलेंचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय. यावेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. या आधी दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही तसाच एक व्हिडीओ शेअर केला होता. एकनाथ शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा आणखी एक व्हिडीओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर करण्यात आला होता. निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी घरी अघोरी पूजा करुन घेतली असा दावा यावेळी सूरज चव्हाण यांनी केला. भरत गोगावलेंचा व्हिडीओ पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी भरतशेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का? असा सवाल उपस्थित केला होता, त्यानंतर आता त्यांनी या व्हिडीओबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement


या प्रकरणी बोलताना सूरज चव्हाण म्हणाले, काल मला सूत्रांच्या आधारे एक व्हिडिओ मिळाला. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून बाबा बुवा यांच्याकडून पुजा करून घेत आहे. वसंत मोरे यांनीही एक व्हिडिओ दाखवला होता. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये. एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालायला हवे. पालकमंत्रीपदासाठी अशा प्रकारच्या पुजेचा घाट घालणं चुकीचा आहे. भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडून याची दखल घ्यायला हवी त्यांनी दखल न घेतल्यास आम्ही निर्णय घेऊ असंही पुढे सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.


पुढे बोलताना ते म्हणाले, आजू बाजूला मंदीर नाही पुजेदरम्यान कुठलाही फोटो, नाही मग कसली पुजा होती. हा प्रश्न महायुतीचा भाग म्हणून नाही तर एक जागरूक नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने माझाशी संपर्क साधला होता, ही पूजा पालकमंत्री पदासाठी एक महिन्यापूर्वी झालेली आहे. यावेळी कुठला बळी दिला गेलाय का? एकनाथ शिंदे प्रमुख आहेत ते निर्णय घेतील, असंही पुढे सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल. सुनील तटकरेंवर शिवसेना नेत्यांकडून टिका होतं आहे. आमचीही पालकमंत्रीपदाबाबत अपेक्षा आहे. मात्र मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल. कशासाठी ही पूजा केली त्यांनाच माहीती. मात्र, आमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ती पुजा पालकमंत्रीपदासाठीच केलेली आहे.


वसंत मोरेंनीही व्हिडीओ शेअर केला


या आधी वसंत मोरेंनीही भरत गोगावलेंवर अशाच स्वरुपाचे आरोप केले आहेत. भरत गोगावलेंनी निवडणुकीच्या वेळी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला. 17 ऑक्टोबर 2024 रोजी बगलामुखी मंदिरातून 11 पुजारी बोलावून भरत गोगावलेंनी पूजा केल्याचा आरोप त्यांनी केला. एवढंच नाहीतर राज्यातून मांत्रिक आणून गोगावले अघोरी पूजा घालायचे असा आरोप वसंत मोरेंनी केला. गोगावलेंचे पूजेचे व्हिडीओही त्यांनी शेअर केले आहेत. तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का? मग अशा पूजांचा आधार का घेतला? असा सवालही वसंत मोरे यांनी भरत गोगावलेंना केला. या पूजेसाठी इतर राज्यातून मांत्रिक बोलावण्यात आले आणि त्या पूजेचे व्हिडीओ आमच्याजवळ उपलब्ध आहेत. जर गोगावले यांनी हे नाकारले तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करू असा इशाराही वसंत मोरेंनी दिला.


 भरत गोगावलेंचे प्रत्युत्तर


ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी केलेले आरोप शिंदेंचे आमदार भरत गोगावलेंनी फेटाळले.  मला अघोरी पूजा करायची असती तर पालकमंत्रिपदासाठीच केली नसती का असा प्रतिसवाल गोगावलेंनी केला. आम्ही पंढरपूर, सिद्धीविनायक, स्वामी समर्थांच्या मंदिरात प्रार्थना करतो. त्यामुळे अघोरी पूजा वगैरे काही करत नसल्याचं भरत गोगावलेंनी म्हटलं.