Maharashtra Rain : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. अनेक भागात सध्या अवकाळी पावसाचा (Unseasonal rains) जोर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यामध्ये उन्हाचा चटका असल्याचं चित्र आहे. दरम्यान, या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मात्र फटका बसत आहे. सलग पाचव्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. आज दुपारच्या सुमारास नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं नाशिक शहराच्या मध्यवस्तीतील रस्त्यांना अक्षरशः नदी नाल्याचा रुप आलं होतं. तसेच जालना, बीड या जिल्ह्यातही देखील अवकाळी पाऊस झाला आहे. 

नाशिकमध्ये सलग पाचव्या दिवशी अवकाळी पाऊस

नाशिकमध्ये सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. 15 ते 20 मिनिट नाशिककरांना पावसांने झोडपून काढले आहे. 

बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तब्बल तासभर धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील विविध भागात दुपारनंतर दमदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असता तरी काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल देखील जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. आज बीड, गेवराई पाटोदा वडवणी भागासह इतर ठिकाणी विजेच्या कडगडाटासह पाऊस बरसतो आहे.

जालन्यातील भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर

जालना जिल्ह्यात आज  अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. भोकरदन तालुक्यात दुपारपासून सर्वदूर जोरदार पाऊस बरसला, तालुक्यातील राजूर, बिलोरा, लिंगेवाडी, वालसा गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला अनेक ठिकाणी ओढे नाले या अवकाळी पावसामुळे भरून वहात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा 

धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. सोसाटयाच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस कोसळल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान. कडाक्याच्या उन्हात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात थंडावा , वाढत्या गर्मी पासून काहीसा दिलासा मिळाला आहे. 

राज्यात पुढील तीन-चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

राज्यात पुढील तीन-चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सापाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची (Weather Update) स्थिती आहे. त्यापासून उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची ही माहिती समोर आली आहे. 

पावसाळा तोंडावर नाल्यांची कामे अर्धवट, डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील नागरिकांचा संताप

डोंबिवली एमआयडीसी मिलाप नगर निवासी भागात एमआयडीसी कडून नाले दुरुस्तीची  कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र पावसाळा तोंडावर आलेला असताना ही कामे अद्यापही संथ गतीने सुरु आहेत तर काही कामे रखडल्याचे दिसून येत आहे. या नाल्यांच्या कामासाठी काही ठिकाणी पाणी अडवल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मिलाप नगर परिसरात पावसाळ्यात अनेक ठिकणी पाणी साचते. त्यामुळं या नाल्यांची कामे पावसाळ्याआधी पूर्ण न झाल्यास अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. अनेक ठिकाणी ही नाल्यांचे कामे अद्यापही रखडलेले आहेत तर काही ठिकाणी हे कामे निकृष्ट दर्जाचे झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पावसाळयात या अर्धवट नाल्यांमुळे पाणी तुंबल्यास नागरिकांचे हाल होण्याची शक्यता वर्तवत पावसाळ्यापूर्वी नाल्यांची कामे पूर्ण करावीत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचे ढग कायम; पुढील चार दिवस तीव्र सतर्कतेचा इशारा, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, IMD चा अंदाज काय?