नागपूर : भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने ड्रोन हल्ले आणि सीमारेषेवर (Border) गोळीबार सुरू केला होता. मात्र, भारताने पाकिस्तानला तगडं उत्तर देत, त्यांचे ड्रोन हवेतच जिरवले. याशिवाय सीमारेषेवरही भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्त्युतर दिले. त्यामुळे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आता वेगळ्या वळणावर जाणार असल्याची चर्चा जोर धरत असतानाच दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांनी सोशल मीडियातून जाहीर केलं. त्यानंतर, भारताच्यावतीनेही पत्रकार परिषद घेऊन शस्त्रसंधीची माहिती देण्यात आली. त्यामुळे, भारताने शस्त्रसंधी का मान्य केली?, अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधीचे कारण नेमकं काय? असे अनेक प्रश्न भारत आणि जगभरातील विश्लेषकांना पडले आहेत. त्यावर, आता माजी व्हाईस एअर मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी विस्तृत माहिती दिली आहे. पाकिस्तानने (Pakistan) माघार घेण्याची 5 ते 6 कारणेही त्यांनी सांगितली.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची पाळेमुळे उखळून फेकण्याचा निर्धाराने भारताने सुरू केलेलं ऑपरेशन सिंदूर हळू हळू पूर्णत्वाकडे जात असताना अचानकच अमेरिकेच्या पुढाकाराने सिजफायर का झालं? भारताने तो का स्वीकारला आहे? युद्धसदृश परिस्थितीतील तीन चार दिवसांच्या कालावधीत उघडरित्या काय घडलं? आणि पडद्यामागून काय घडामोडी घडल्या? अशा विविध प्रश्नांची उत्तरे माजी एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. देशाचे दीर्घकालीन हित लक्षात घेता भारताने सिजफायर का स्वीकारले, याचेही विश्लेषण त्यांनी विविध कारणांसह केले आहे.
सूर्यकांत चाफेकर यांच्या मते, अचानक युद्धविराम घडण्यामागे पाच ते सहा महत्त्वाची कारण आहेत. त्यापैकी बहुतांशी कारणे पाकिस्तानच्या बाजुची आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानची भारतासोबत युद्ध लढण्याची किंवा युद्धसदृश परिस्थितीत संघर्ष करण्याची क्षमता तीन-चार दिवसांपेक्षा जास्त नव्हती. त्यामुळे त्या मर्यादेतच पाकिस्तानने युद्धविराम मान्य केले. याशिवाय पाकिस्तानमधील अंतर्गत स्थिती खास करून बलुचिस्तानमधील स्थिती फारशी चांगली नव्हती. तसेच पाकिस्तानी सैन्यामध्येही अंतर्गत धुसफूस सुरूच होती. या स्थितीत बिथरलेला पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्य अण्वस्त्राचे वापर करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळेही अमेरिकेची चिंता वाढली होती. भारताच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं कारण म्हणजे युद्धात पाकिस्तानचा पराभूत होणं आणि पाकिस्तान एका अपयशी राष्ट्राच्या म्हणजेच 'failed state' च्या श्रेणीत जाणे भारताला देखील परवडले नसते. कारण, पाकिस्तानमधील अराजकता, अस्थिरता आणि अशांततेचे विपरीत परिणाम भारतावरही झाले असते. त्यामुळे आपल्या नेतृत्वाने विचारपूर्वकच युद्धविरामाचा निर्णय घेतल्याचे माजी एअर मार्शल चाफेकर यांनी एबीपी माझाशी बोलातना अनुभवातून सांगितले.
पाकिस्तानकडे एअर प्रशिक्षत सैन्याचा अभाव
युद्धावेळी फक्त एअर डिफेन्स सिस्टम असून चालत नाही, तर ते ऑपरेट करणारे प्रशिक्षित सैन्य असावे लागते जे भारताकडे आहे. मात्र, पाकिस्तानकडे तसे प्रशिक्षित सैन्य नाही, हा फरक आपल्याला मागच्या दोन दिवसातून दिसत आहे. ए्अर डिफेन्स सिस्टम ऑपरेट करण्यात आपले सैन्य निष्णात आणि वेल ट्रेन आहे, हेच आपल्या यशाचे गमक आहे, असेही सूर्यकांत चाफेकर यांनी म्हटले.
आपण पाकिस्तानची मुव्हमेंट ट्रॅक करू शकतो
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टम हे पाकिस्तानी मिसाईल लाँच झाल्यापासून ओळखू शकते, पाकिस्तान लढाखू विमानाची मूव्हमेंट लगेच ट्रॅक करून ते पाडू देखील शकते. त्यामुळे पाकिस्तानला ड्रोनचा वापर करावा लागत आहे, त्यामुळे सध्या पाकिस्तान बेभान होऊन कृती करत आहे. या परिस्थिती पाकिस्तान भारताला उत्तर देऊ शकेल अशा स्थितीत पाकिस्तान नाही. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असावे, त्यासाठी पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची बैठक बोलावली. त्यामुळे, पाकिस्तान कधी पांढरा झेंडा दाखवते, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा