Maharashtra Rain Alert on Ganpati Visarjan:  राज्यात गणेशोत्सव सुरु असून पावसानं काहीसा ब्रेक घेतल्यानं बाप्पाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी पहायला मिळत आहे. राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. मागील आठवड्यात काही भागात जोरदार सरी होत्या; तर काही भागात पावसानं विश्रांती घेतल्याचं दिसून आलं. दरम्यान, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागतेय. बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी लागणार का? हवामान विभागाने यासंदर्भात अंदाज वर्तवलाय.


दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी X माध्यमावर विसर्जनाला राज्यात काय स्थिती असेल यावर प्रकाश टाकला आहे. यानुसार सिंधुदुर्ग- गोवा  व पूर्व विदर्भा काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कोरड्या ते अतिशय हलक्या सरींची शक्यता आहे.


कुठे कोणता अलर्ट?


हवामाान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उद्या म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात अजुनतरी कुठेही अलर्ट देण्यात आला नाही. मात्र, मराठवाडा, विदर्भ खान्देशातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी , नांदेड, हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश असून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही पावसाची हजेरी राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. सिंधुदुर्ग-गोवा व पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.उर्वरित;मुंबई, ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कोरड्या ते अतिशय हलक्या सरींची शक्यता असल्याची माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली.


 






विसर्जनानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता


विसर्जनानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा खान्देश तसेच कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.


चक्राकार वाऱ्यांची स्थिती काय?


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या कमी दाबाचा पट्टा पश्चिम बंगालच्या दिशेने हळूहळू सरकत असून पुढील १२ तासांत हा दाब कमकुवत होण्याची शक्यता आहे. चक्राकार वारे नैऋत्येकडे  असून उत्तरप्रदेश आणि हरियाणाला जोडून असणाऱ्या भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.


पुढील ७ दिवस काय अंदाज?


दरम्यान, पुढील सात दिवस पावसाचा जोर काहीसा हलक्या व मध्यम स्वरुपाचा राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकणात पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे.