Maharashtra Weather Update Today : महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता (Rain Alert) हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या 3 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी हलक्या पावसाची आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज 7 जानेवारीला राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यत आहे. तर 8 जानेवारीला धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून पावसाची येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशाच्या हवामानात बदल, नैऋत्य वाऱ्यांचा परिणाम
हवामान खात्याने दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या लगतच्या भागात चक्राकार वाऱ्याचं क्षेत्र निर्माण होत आहे, हे सरासरी समुद्रसपाटीपासून 3.1 किमी पर्यंत पसरलेले आहे. आग्नेय अरबी समुद्रावर कमा दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपट्टी आणि उत्तर प्रदेश भागात नैऋत्य वाऱ्यांचा परिणाम दिसून येत आहे.
पुढील 24 तासांत पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि पश्चिम हिमालयातही हलक्या पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
आजही पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजनुसार, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, या भागात शनिवारी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आजही या भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. नैऋत्य अरबी समुद्रावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर कोकणातून उत्तरेकडे पसरलेल्या बाष्पाचे ढग तयार झाल्यामुळे हवामानावर परिणाम दिसून येत आहे.
राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट
दरम्यान, सध्या एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरात एक थंड हवेची स्थिती निर्माण झाली असून हे जम्मू ते उत्तर पाकिस्तानपर्यंत परसलं आहे. यामुळे हरियाणासह लगतच्या भागात हवेच्या वरच्या थरामध्ये चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या वातावरणामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास फुकट जाण्याची चिंता त्यांना सतावत आहे.